जळगाव समाचार | १४ मार्च २०२६
जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असताना दुसऱ्या गटाने अचानक ठाण्यात घुसून त्यांच्यासह त्यांच्या दोन ते तीन सहकाऱ्यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे काही काळ पोलीस ठाण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील वाल्मीक नगर परिसरात भाजपचे माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांचा काही तरुणांशी किरकोळ वाद झाला होता. या वादाचे रूपांतर पुढे तीव्र वादात झाल्यानंतर सोनवणे हे आपल्या काही समर्थकांसह शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते. त्याच वेळी विरोधी गटातील काही तरुण पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की व मारहाण सुरू झाली. सोनवणे यांच्या कार्यकर्त्यांनीही प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केल्याने पोलीस ठाण्यात काही काळ मोठा गोंधळ उडाला.
दरम्यान, परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले व घटनेवर नियंत्रण मिळवले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे यांना सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलीस वाहनातून दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल होऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. घटनेनंतर ठाणे परिसरात राखीव पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या वादाला नुकतीच झालेली महानगरपालिका निवडणुकीची राजकीय पार्श्वभूमी असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

![]()




