जळगाव समाचार | १४ मार्च २०२६
शहरातील प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यांवर अनधिकृतपणे उभी केली जाणारी वाहने वाढत असल्यामुळे वाहतुकीची कोंडी गंभीर स्वरूप धारण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या महापौर दीपाली मनोज काळे यांनी शहर वाहतूक शाखेला धडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी वाहतूक शाखेच्या निरीक्षकांना यासंदर्भात पत्र पाठवून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जळगाव हे जिल्ह्याचे मुख्य केंद्र असल्याने विविध तालुके, उपनगर आणि ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कामकाज, वैद्यकीय सेवा, शिक्षण तसेच बाजारपेठेतील व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणावर शहरात येत असतात. त्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते.
मात्र, काही अवजड वाहनधारक तसेच इतर वाहनचालकांकडून प्रमुख आणि वर्दळीच्या रस्त्यांवर नियमबाह्य पद्धतीने वाहने पार्क केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः अजिंठा चौफुली ते लड्डा फार्म हाऊस या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याची बाब महापौरांच्या निदर्शनास आली आहे. याशिवाय काही कारबाजार चालकांकडून विक्रीसाठी ठेवलेली जुनी वाहनेही रस्त्यावर उभी करण्यात येत असल्याने रस्त्याची उपलब्ध रुंदी कमी होत आहे. भास्कर मार्केट परिसरात जुनी वाहने विकणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेकडो वाहने रस्त्यावर उभी केली जात असल्याने या भागात वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी महापौर कार्यालयाकडे केलेल्या तक्रारींमध्ये नमूद केले आहे.
या पार्श्वभूमीवर महापौर दीपाली मनोज काळे यांनी जळगाव शहर वाहतूक शाखेला पत्र पाठवून प्रमुख रस्त्यांवर अनधिकृतपणे वाहने उभी करणाऱ्या वाहनधारकांवर तसेच वाहन विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्याची विनंती केली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि भविष्यात अशा प्रकारे बेशिस्तपणे वाहने उभी करण्यावर कायमस्वरूपी आळा बसावा यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने तातडीने कारवाई करावी, अशी अपेक्षा महापौरांनी व्यक्त केली आहे.

![]()




