दक्षता पेट्रोलपंप अपहार प्रकरणात PSI वाल्मीक वाघ व मुलगा अटकेत

 

जळगाव समाचार | ११ मार्च २०२६

जळगाव शहरातील पोलीस दलाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या ‘दक्षता’ पेट्रोलपंपावरील तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ यांनी अखेर पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. त्यांच्या सोबतच या प्रकरणात सहभागी असल्याच्या संशयावरून त्यांचा मुलगा शेखर वाल्मीक वाघ यालाही अटक करण्यात आली आहे. जळगाव पोलीस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत ‘दक्षता पेट्रोलपंप’ चालविला जात असून, या पंपाच्या आर्थिक व्यवहारांची आणि दैनंदिन व्यवस्थापनाची जबाबदारी पीएसआय वाल्मीक मधुकर वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

पेट्रोलपंपाच्या आर्थिक व्यवहारांचे ऑडिट आणि अंतर्गत तपासणी दरम्यान खात्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक तफावत आढळून आल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी सुरू केली. या चौकशीत पेट्रोलपंपाच्या व्यवहारातून तब्बल १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. यानंतर जळगाव शहर पोलीस ठाण्यात वाल्मीक मधुकर वाघ यांच्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाघ आणि त्यांचा मुलगा शेखर वाघ हे दोघेही काही दिवसांपासून फरार होते. अखेर त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्याने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत अटक केली. जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना १३ मार्चपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत वाल्मीक वाघ यांनी या प्रकरणात धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी सव्वा कोटी रुपयांच्या अपहाराचा आरोप फेटाळून लावत आपण केवळ १० ते १५ लाख रुपयांचाच अपहार केल्याचे सांगितले आहे. मात्र, पोलिसांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रे, आर्थिक नोंदी आणि तांत्रिक पुराव्यांनुसार अपहाराची रक्कम १ कोटी ३३ लाखांहून अधिक असल्याचे स्पष्ट होत असल्याने या पैशांचा नेमका वापर कुठे आणि कसा झाला, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे जळगाव पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here