जळगाव समाचार | ५ मार्च २०२६
शहरातील सातत्याने वाढणारी वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांची अनियंत्रित वाढ आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अतिक्रमण यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जळगाव महानगरपालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी, ४ मार्च रोजी महापौर दालनात पार पडलेल्या शहर फेरीवाला समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत शहरात ‘टाईम झोन’ निश्चित करून व्यवसायाला शिस्त लावण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉकर्सवर कोणतीही दयामाया न दाखवता तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापौर दीपमाला काळे यांनी स्पष्ट आदेश देत अतिक्रमण विभागाला बजावले.
बैठकीत फुले मार्केटमध्ये २६५ फेरीवाल्यांना देण्यात आलेल्या जागेच्या वापरासंदर्भातील प्रश्न आणि शहरातील वाढती गर्दी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. फेरीवाला समितीच्या प्रतिनिधींनी व्यवसायासाठी अपुऱ्या जागेचा प्रश्न उपस्थित करत अतिक्रमण कारवाईत कथित पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप केला. मात्र, महापौर दीपमाला काळे यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करत स्पष्ट शब्दांत सांगितले की, लोकप्रतिनिधींना दिसणारे अतिक्रमण अतिक्रमण विभागाला का दिसत नाही, याचे उत्तर द्यावे लागेल. कारवाई करताना कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव झुगारून देऊन नियमांचे कठोर पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः व्यवसाय संपल्यानंतर रस्त्यावरच हातगाड्या सोडून जाणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहापौर मनोज चौधरी यांनी सुभाष चौक, चित्रा चौक आणि बळीराम पेठ या अत्यंत गर्दीच्या ठिकाणी तातडीने बदल घडवून आणण्याची आवश्यकता व्यक्त केली. महामार्गालगत झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी प्रशासनाला केवळ दोन ते तीन दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले. बैठकीस महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, मोहन तिवारी, नंदू पाटील तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
शहराच्या स्वच्छतेचाही प्रश्न बैठकीत प्राधान्याने चर्चिला गेला. पिंप्राळा आणि इतर भाजी बाजार परिसरात मनपाकडून कचरा कंटेनर उपलब्ध करून दिले जाणार असून, सर्व विक्रेत्यांनी आपला कचरा त्यामध्येच टाकणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
शहरातील हॉकर्सच्या वाढत्या संख्येमुळे नियोजन कोलमडत असल्याची गंभीर बाबही बैठकीत समोर आली. सन २०१४ मध्ये नोंदणीकृत फेरीवाल्यांची संख्या २,९५० होती, ती २०२२ च्या सर्वेक्षणानुसार ६,००० च्या पुढे गेली आहे. या वाढत्या संख्येमुळे वाहतूक व्यवस्थापन, पादचारी सुरक्षेचा प्रश्न आणि व्यापारी शिस्त यावर विपरीत परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून १५ मार्चनंतर होणाऱ्या पुढील बैठकीत ‘हॉकर्स झोन’ची अंतिम रूपरेषा निश्चित करण्यात येणार आहे. झोन निश्चित झाल्यानंतर अधिकृत विक्रेत्यांना विनाकारण कारवाईचा त्रास होणार नाही, असे आश्वासनही प्रशासनातर्फे देण्यात आले.
‘टाईम झोन’च्या या नव्या प्रयोगामुळे जळगाव शहराला अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीच्या समस्येतून कितपत मुक्तता मिळते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी झाली तर शहरातील वाहतूक, स्वच्छता आणि व्यवसाय व्यवस्थापनात सकारात्मक बदल अपेक्षित आहे.

![]()




