जळगावात एकेरी वापर प्लास्टिकविरोधात महापौर दिपमाला काळे सक्रिय

 

जळगाव समाचार | १५ फेब्रुवारी २०२६

शहरात एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे पर्यावरणीय तसेच आरोग्याचे गंभीर धोके लक्षात घेता दिपमाला काळे यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्लास्टिक विक्रेते आणि जळगाव शहर महानगरपालिका प्रशासन यांच्यात समन्वय साधण्यासाठी सोमवार, १६ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील १७ व्या मजल्यावरील महापौर दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत शहरात सिंगल यूज प्लास्टिकवरील बंदी प्रभावीपणे कशी अंमलात आणता येईल, याबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती महापौरांनी प्रशासनाला पाठविलेल्या पत्राद्वारे दिली आहे.

महापौर दिपमाला काळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, एकेरी वापराचे प्लास्टिक मोकाट जनावरांनी खाल्ल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. तसेच प्लास्टिक पिशव्या आणि साहित्य गटार व नाल्यांमध्ये साचल्याने पाण्याचा निचरा अडतो, परिणामी पावसाळ्यात अनेक रहिवासी भागांमध्ये पाणी साचून घरांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडतात. प्लास्टिकचे विघटन होत नसल्यामुळे ते जमिनीत साचून राहते व जमिनीची सुपीकता कमी होते, ज्यामुळे पर्यावरणाला दीर्घकालीन हानी पोहोचत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शासनाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी लागू केली असली तरी शहरात अद्याप त्याचा वापर सुरू असल्याचे वास्तवही त्यांनी अधोरेखित केले आहे.

या पार्श्वभूमीवर प्लास्टिक विक्रेते असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी बैठकीस उपस्थित राहावे, अशा सूचना देण्याचे निर्देश सहायक आयुक्त (आरोग्य) यांना देण्यात आले आहेत. तसेच महानगरपालिका प्रशासनाने अद्ययावत माहिती व आवश्यक अहवालासह बैठकीस उपस्थित राहण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शहरातील पर्यावरण संरक्षण, नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छता यासाठी सिंगल यूज प्लास्टिकवर प्रभावी नियंत्रण आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले असून, या बैठकीत महत्त्वपूर्ण व कठोर निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी जळगाव शहरात प्लास्टिकविरोधी मोहिमेला अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here