जळगावात कंजरभाट समाजाचा प्रथमच भव्य सामूहिक विवाह सोहळा संपन्न


जळगाव समाचार | १३ फेब्रुवारी २०२६

जळगाव शहरात कंजरभाट समाजाच्या वतीने प्रथमच भव्य-दिव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, या उपक्रमात समाजातील सहा वधू-वरांचे विवाह धार्मिक विधी व पारंपरिक वातावरणात उत्साहात संपन्न झाले. सामाजिक एकोपा, खर्चिक विवाह परंपरेला पर्याय आणि नवदांपत्यांना सामूहिक आशीर्वाद मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद लाभला. विवाह सोहळा दि. १२ फेब्रुवारी रोजी पार पडला असून, यावेळी कंजरभाट समाज जळगावातील ज्येष्ठ पंच, वरिष्ठ मान्यवर तसेच नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, पुणे, कोल्हापूर आणि संगमनेर येथील समाजातील प्रमुख पदाधिकारी व ज्येष्ठ पंच मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व नवविवाहित जोडप्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आशीर्वाद दिले.

या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन कंजरभाट समाज जळगाव आणि नवयुवक कंजरभाट समाज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. सामाजिक परंपरा जपतानाच समाजातील युवक-युवतींना एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणे, परस्पर ऐक्य वाढवणे आणि समाजहिताचे उपक्रम राबविणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख हेतू होता. संपूर्ण सोहळा शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून, उपस्थितांनी आयोजकांच्या नियोजनाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here