जळगाव समाचार | ९ फेब्रुवारी २०२६
मूळचे जळगावचे रहिवासी व सध्या नाशिक येथे ‘एमआर’ म्हणून कार्यरत असलेले कौस्तुभ सतीश पोतदार (वय २७) यांनी ७ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जळगाव शहरातील नवनाथ नगर परिसरात घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, सुशिक्षित तरुणाच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कौस्तुभ काही दिवसांपासून नवनाथ नगर येथील आपल्या काकांकडे वास्तव्यास होता. ७ फेब्रुवारी रोजी घरातील सर्व सदस्य काही कामानिमित्त बाहेर गेले असताना, त्याने घरातच गळफास घेतला. कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
कौस्तुभच्या आईचे यापूर्वीच निधन झाले असून, त्यांचे वडील जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात वास्तव्यास आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ८ फेब्रुवारी रोजी मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुलाब माळी पुढील तपास करीत आहेत.

![]()




