खेडी शिवारात कुंटणखान्यावर छापा; अल्पवयीन मुलीची सुटका, सराईत आरोपी अटकेत

जळगाव समाचार | २५ जानेवारी २०२६

मानव तस्करी विरोधी पथक (एएचटीयू) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने खेडी शिवारातील हनुमान नगर परिसरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर धाडसी कारवाई करत अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. या कारवाईत कुंटणखाना चालविणारा विजय सखाराम तायडे (वय ३२, रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याला अटक करण्यात आली. ही कारवाई दि. २३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली असून पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजय तायडे याने सहा महिन्यांपूर्वी हनुमान नगर परिसरात भाडेतत्त्वावर एक घर घेतले होते. या घरात तो एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून देहविक्रीचा व्यवसाय चालवित असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे मानव तस्करी विरोधी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करून कारवाईचे नियोजन करण्यात आले.

दि. २३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजता पथकाने डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. डमी ग्राहकाने मिसकॉल दिल्यानंतर तत्काळ कारवाई करत पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकला. छाप्यात घरातून अल्पवयीन मुलीसह आरोपी विजय तायडे याला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलीची चौकशी केली असता, आरोपीने तिला घरात डांबून ठेवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात पोक्सो कायद्याच्या कलमांची भर घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विजय तायडे याच्याविरुद्ध यापूर्वीही कुंटणखाना चालविणे व वेश्या व्यवसाय करवून घेण्याचे तीन गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एएचटीयूचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, पोहेकॉ नितीन बाविस्कर, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, रविंद्र पाटील, रविंद्र गायकवाड, अनिल पाटील तसेच महिला कर्मचारी निलीमा सुशीर, भुषण कोल्हे, वहिदा तडवी व राहुल वानखेडे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here