‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वात खान्देशचा युट्युब स्टार सचिन कुमावतची दमदार एन्ट्री

 

जळगाव समाचार | १२ जानेवारी २०२६

कलर्स मराठी वाहिनीवर ११ जानेवारीपासून सुरू झालेल्या ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. अभिनेता रितेश देशमुख यंदा हा लोकप्रिय रिॲलिटी शो होस्ट करत असून, पुढील १०० दिवस विविध क्षेत्रांतील १७ स्पर्धक बिग बॉसच्या घरात एकत्र राहणार आहेत. ‘दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार!’ या घोषवाक्यासह सुरू झालेल्या या पर्वात अभिनेता-अभिनेत्री, कॉमेडियन, इन्फ्लूएन्सर, नृत्यांगना तसेच राजकीय पार्श्वभूमी असलेली व्यक्तिमत्त्वे सहभागी झाली आहेत. पहिल्याच दिवशी दीपाली सय्यद, सागर कारंडे, सोनाली राऊत, राकेश बापट यांच्यासह अनेक ओळखीचे चेहरे घरात दाखल झाल्याने शोला चांगली सुरुवात मिळाली आहे.

या पर्वात विशेष लक्ष वेधून घेणारी एन्ट्री ठरली ती जळगाव जिल्ह्याचा सुपुत्र आणि खान्देशचा लोकप्रिय युट्युब स्टार सचिन कुमावत याची. तिसरा स्पर्धक म्हणून घरात प्रवेश करताच सचिनने आपल्या साध्या, सहज आणि मोकळ्या स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकली. घरात प्रवेश करताना त्याने अहिराणी भाषेत संवाद साधत आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्याची ही खास शैली घरातील सदस्यांसह प्रेक्षकांमध्येही चर्चेचा विषय ठरली असून, खान्देशी बोलीभाषा आणि संस्कृतीचे प्रतिनिधित्व तो प्रभावीपणे करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सामान्य कुटुंबातून पुढे येत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या सचिन कुमावतने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मूळ शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील रहिवासी असलेल्या सचिनचे युट्युबवर २० लाखांहून अधिक सबस्क्राईबर्स असून, इंस्टाग्राम व फेसबुकवरही लाखो चाहते आहेत. ‘बबल्या केसावर ईकस फुगे’ या अहिराणी गाण्याच्या व्हिडीओला आतापर्यंत सुमारे २९ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या माध्यमातून खान्देशी संस्कृती राज्यभर पोहोचवण्याची मोठी संधी सचिनला मिळाली असून, तो या स्पर्धेत किती पुढे जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here