जळगाव समाचार | ३१ डिसेंबर २०२५
जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात बुधवारी (३१ डिसेंबर) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या साई गणेश गोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) याचा सायंकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती पसरताच परिसरात खळबळ उडाली असून, एकुलता एक मुलगा गमावल्याने त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदयद्रावक होता.
साई गोराडे हा आई-वडील, बहिण तसेच आजी-आजोबांसह डीएनसी कॉलेज परिसरात वास्तव्यास होता व सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत होता. शुभम सोनवणे (रा. कालिंका माता मंदिर परिसर, जळगाव) हा त्याचा महाविद्यालयीन मित्र असून, किरकोळ कारणावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सकाळीही त्यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दुपारी साई हा आईला सांगून गोलाणी मार्केटमध्ये खाण्याच्या वस्तू खरेदीसाठी आला असताना, नेक्स्ट शोरूमसमोरील रस्त्यावर शुभम सोनवणे याने त्याच्यावर चाकूने सपासप वार केले.
हल्ल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयितास घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने तत्काळ ताब्यात घेतले व त्याला शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. गंभीर जखमी साई याला खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.

![]()




