जळगाव महापालिका निवडणूक : भाजप-सेनेला राष्ट्रवादीची ‘आठवण’; जागावाटप रविवारी होणार जाहीर…

जळगाव समाचार | २६ डिसेंबर २०२५

जळगाव शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीमधील मित्र पक्ष भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्र येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिन्ही घटक पक्षांनी संयुक्तपणे निवडणूक लढवण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले असून, जागा वाटपाचे अंतिम सूत्र रविवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जळगावात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत झालेली चर्चा सकारात्मक ठरली असून, त्यानंतर महायुतीची औपचारिक घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जळगाव जिल्ह्यातील नेत्यांना महापालिका निवडणूक तिन्ही घटक पक्षांनी एकत्रितपणे लढवावी, अशी स्पष्ट सूचना दिल्याची माहिती आहे. त्याच अनुषंगाने शनिवारी तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक घेण्यात आली.

या बैठकीस भाजपचे निवडणूक प्रमुख आ. राजूमामा भोळे, निवडणूक प्रभारी आ. मंगेश चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. अनिल पाटील, जिल्हाध्यक्ष संजय पवार, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. जळगाव महानगरपालिकेतील एकूण ७५ जागांवर महायुती संयुक्तपणे निवडणूक लढवणार असून, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याची घोषणा रविवारी केली जाईल, असे पक्षनेत्यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here