जळगाव समाचार | २५ डिसेंबर २०२५
मोबाईलवर रील तयार करण्याचा ट्रेंड अलीकडे तरुणाईत झपाट्याने वाढत असून, अनेक तरुण-तरुणी या माध्यमातून आपली कला सादर करत आर्थिक कमाईही करत आहेत. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाची दखल घेत जळगाव शहर महानगरपालिकेनेही आता रील्स तयार करणाऱ्यांसाठी रोख बक्षिसांची स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढवणे व नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महानगरपालिका प्रशासन व स्वीप (SVEEP) अभियानाच्या संयुक्त विद्यमाने ही रील्स मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोशल मीडियासारख्या प्रभावी व वेगवान माध्यमाच्या माध्यमातून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून, विशेषतः तरुण पिढीला मतदानाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी करून घेण्यावर भर देण्यात आला आहे. मतदानाचे महत्त्व, प्रत्येक मताचे मूल्य, लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी तसेच मतदान हा हक्क व कर्तव्य आहे, हा संदेश रील्सद्वारे प्रभावीपणे पोहोचविण्याचा मानस आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी तयार केलेल्या रील्समध्ये मतदान जनजागृतीचा सकारात्मक व प्रेरणादायी आशय असणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार, उमेदवारांचे समर्थन अथवा विरोध करणारा मजकूर तसेच आचारसंहितेला बाधा पोहोचेल असे दृश्य किंवा संवाद वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. उत्कृष्ट ठरलेल्या रील्सना प्रथम क्रमांकासाठी ३ हजार, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत.
सहभागी स्पर्धकांनी आपली रील जळगाव शहर महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर टॅग करून किंवा दिलेल्या लिंकद्वारे सादर करावयाची आहे. स्पर्धेचा कालावधी २४ डिसेंबर ते १४ जानेवारी असा असून, या कालावधीत प्राप्त झालेल्या रील्समधून उत्कृष्ट, आशयपूर्ण व जनजागृती करणाऱ्या रील्सची निवड केली जाणार आहे. स्पर्धकांचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असावे व ते जळगाव शहराचे नागरिक असणे आवश्यक आहे. अश्लीलता, जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे वक्तव्ये तसेच मादक पदार्थांच्या प्रचारास मनाई असून, युवक-युवतींनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या आयुक्तांनी केले आहे.

![]()




