जळगाव समाचार | २५ डिसेंबर २०२५
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आघाडी व युतींची गणिते दिवसेंदिवस बदलताना दिसत आहेत. काही शहरांत महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित ताकद दाखवत असताना, काही ठिकाणी स्वबळावर लढण्याचे संकेतही मिळत आहेत. अशातच पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात झालेली अनपेक्षित युती राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी ठरली असून, काँग्रेस हायकमांडने अटी-शर्थींवर या आघाडीला दिलेली मान्यता नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरली आहे.
दरम्यान, जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी अधिकृतपणे युती जाहीर केली असली, तरी या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश न झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सत्ताधारी महायुतीतील हा रणनीतीचा भाग आहे की जाणीवपूर्वक ठेवलेला दूरावा, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात असून, राष्ट्रवादी अजित पवार गटाची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर जळगावातही पुण्याप्रमाणेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये स्थानिक पातळीवर समन्वय घडणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. दोन्ही गट एकत्र येणार की स्वतंत्र राजकीय भूमिका घेणार, यावरच जळगाव महापालिकेच्या निवडणूक रणधुमाळीची दिशा ठरणार आहे. आगामी काही दिवसांत होणाऱ्या हालचाली जळगावच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवतील, अशी चिन्हे सध्या स्पष्टपणे दिसून येत आहेत.

![]()




