जळगाव समाचार | २२ डिसेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील १६ नगर परिषद व दोन नगर पंचायतींच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट केली आहेत. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचा समावेश असलेल्या सत्ताधारी महायुतीने एकूण १४ ठिकाणी आपले वर्चस्व सिद्ध करत जिल्ह्यावर दबदबा कायम ठेवला आहे. मात्र या निवडणुकांमध्ये भाजप व शिंदे गटाने अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे लढत दिल्याने ही निवडणूक महायुतीतील अंतर्गत ताकद मोजणारी ठरली.
प्रचाराच्या काळात मुक्ताईनगर, पाचोरा, भडगाव, चोपडा, वरणगाव, नशिराबाद आदी ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढती रंगल्या. स्थानिक नेतृत्व, विकास कामांचा दावा आणि संघटनात्मक बळाच्या जोरावर दोन्ही पक्षांनी आपापली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. परिणामी ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांपुरती मर्यादित न राहता आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली.
निकालांमध्ये भाजपने जामनेर, रावेर, सावदा, फैजपूर, एरंडोल, चाळीसगाव, शेंदुर्णी व नशिराबाद अशा आठ नगर परिषदांमध्ये नगराध्यक्षपद पटकावले. विशेषतः जामनेर व चाळीसगावमध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम राखत मतदारांचा विश्वास संपादन केला. दुसरीकडे, पाचोरा, भडगाव, पारोळा, चोपडा, अमळनेर व मुक्ताईनगर या सहा नगर परिषदांमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी नगराध्यक्षपदावर विजय मिळवत संघटनात्मक ताकद अधोरेखित केली.
महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणी शिंदे गटाने भाजपशी फारकत घेतली, तेथे त्यांनी निर्विवाद यश मिळवले. अपवाद ठरलेल्या धरणगावमध्ये युती असूनही शिंदे गटाला पराभव स्वीकारावा लागला, तर पारोळ्यात युतीचा उमेदवार विजयी झाला. एकूण निकाल पाहता भाजपला काही ठिकाणी मोठा हादरा बसला असून शिंदे गटाने आपली ताकद प्रभावीपणे दाखवून दिली आहे. या निकालांचा परिणाम येत्या जळगाव महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांवर दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

![]()




