जळगावचा मतदार विचारतोय: धार्मिक, सामाजिक उपक्रम वाढले, पण नागरी प्रश्न सुटले का?

 

जळगाव समाचार | १९ डिसेंबर २०२५

महानगरपालिका निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया सुरू व्हायची असली, तरी जळगाव शहरातील राजकीय वातावरण आधीच तापू लागले आहे. विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली सुरू असताना, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी नवनव्या मार्गांचा अवलंब केला जात आहे. वरिष्ठ नेत्यांच्या भेटी, प्रभागातील संपर्क वाढवणे यासोबतच आता प्रत्यक्ष प्रचार सुरू होण्याआधीच निवडणूक वातावरण निर्माण केले जात असल्याचे चित्र आहे. मात्र, या साऱ्या घडामोडींमध्ये मतदारांच्या खऱ्या प्रश्नांना कितपत प्राधान्य दिले जात आहे, हा सवाल उपस्थित होत आहे.

तिकीट जाहीर होण्याआधीच काही इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील भाविकांना शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी स्थळाच्या दर्शनासाठी स्वखर्चाने नेण्यास सुरुवात केली आहे. बस, भोजन आणि इतर सुविधा देत सामूहिक दर्शन यात्रांचे आयोजन होत आहे. धार्मिक श्रद्धेचा आदर करावा की नाही, हा प्रश्न नसून, अशा उपक्रमांमुळे पाणी, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवरून लक्ष हटवले जात नाही ना, असा प्रश्न सामान्य मतदार विचारू लागला आहे.

याच काळात काही प्रभागांत जुन्या व जीर्ण मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. मंदिरांची रंगरंगोटी, दुरुस्ती आणि इतर कामे सुरू असली, तरी अनेक भागांत अद्याप खड्डेमय रस्ते, साचलेले सांडपाणी आणि अपुऱ्या नागरी सुविधा नागरिकांना भोगाव्या लागत आहेत. मंदिर दुरुस्ती महत्त्वाचीच, पण नागरी सुविधांची जबाबदारी कुणाची, आणि निवडणुकीनंतरही हीच तत्परता टिकणार का, असे प्रश्न मतदारांच्या मनात निर्माण होत आहेत.

राजकीय विश्लेषकांच्या मते, हे सर्व उपक्रम म्हणजे ‘सॉफ्ट कॅम्पेनिंग’चा भाग असून, उमेदवारी निश्चित होण्याआधीच मतदारांच्या भावनांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न आहे. उमेदवारांच्या श्रद्धा आणि सामाजिक कामांचा सन्मान असला, तरी मतदानाचा निर्णय घेताना विकास, पारदर्शकता आणि कामगिरी यांनाच प्राधान्य दिले जावे, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रचाराचा खरा कस लागणार असून, तेव्हा इच्छुक उमेदवार मतदारांच्या प्रश्नांना कितपत ठोस उत्तरे देतात, याकडेच शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here