जळगाव समाचार | १८ डिसेंबर २०२५
जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने राज्याच्या शालेय शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण आणि वेतन अधिक्षक ईजाज तडवी यांच्यावर गंभीर आर्थिक गैरव्यवहार व शिक्षक-कर्मचाऱ्यांची पिळवणूक केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. गणवेश घोटाळ्यात यापूर्वी निलंबित झालेल्या या अधिकाऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवून पुन्हा त्याच पदावर कार्यरत राहिल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणी पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील (वि.स.स.) यांनी १० डिसेंबर २०२५ रोजी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे. तक्रारीत सौ. चव्हाण या शिक्षण संस्थांवर खोट्या चौकशा लावून शिक्षकांचे वेतन थांबवणे, मानसिक व आर्थिक छळ करणे तसेच दलालांच्या माध्यमातून लाखो रुपयांची अवैध वसुली केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या कथित दलालांमध्ये स्वप्निल पाटील (जळगाव), पंकज पाटील (पाचोरा), सतिश पाटील तसेच सौ. चव्हाण यांचे पती धाडी साहेब (विस्तार अधिकारी, भुसावळ) यांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीची दखल घेत शालेय शिक्षण विभागाने ११ डिसेंबर २०२५ रोजी आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांना पत्र पाठवून तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार कक्ष अधिकारी निशा महाजन यांनी हे पत्र जारी केले असून, दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करणे अथवा अधिकार काढून पदावनत करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. यापूर्वी शालार्थ आयडी घोटाळ्यासह विविध अनियमिततांमुळे जळगाव शिक्षण विभाग चर्चेत राहिला असून, सदर आरोपांमुळे संतप्त शिक्षक वर्गात अस्वस्थता वाढली आहे.
दरम्यान, या चौकशी आदेशांबाबत विचारणा केली असता शिक्षणाधिकारी सौ. कल्पना चव्हाण यांनी “यासंदर्भात मला कोणतीही माहिती नाही,” अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, निलंबित अधिकाऱ्यांचे पुन्हा पदावर कायम राहणे, दलालांच्या माध्यमातून कथित वसुली आणि यामागे कोणाचे राजकीय पाठबळ आहे, याबाबत शिक्षण व राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल काय निष्कर्ष काढतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

![]()




