जळगाव समाचार | १२ डिसेंबर २०२५
छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यातील कुद्री गावात ‘रातोरात कोट्यधीश’ बनवण्याच्या आमिषाने केलेल्या गूढ विधीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘५ लाख गुंतवा आणि ते रातोरात अडीच कोटी होतील’ असे सांगत एका प्रसिद्ध व्यावसायिकासह तीन जणांना काळ्या जादूच्या विधीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. बुधवारी उशिरा रात्री हा कथित तांत्रिक विधी सुरू असतानाच तिघांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.
कुद्रीतील अश्रफ मेमन यांच्या फार्महाऊसवरील खोलीत भंगार व्यापारी मोहम्मद अश्रफ मेमन, कोरबा येथील सुरेश साहू आणि बलौदा बाजारचे नितीश कुमार हे मृतावस्थेत सापडले. घटनास्थळी मृतांच्या गळ्यावर दाबल्याच्या खुणा आणि एकाच्या तोंडात लिंबू आढळल्याने हा मृत्यू नैसर्गिक नसून संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. बिलासपूरहून आलेल्या ‘बैगा’सह पाच जणांनी तंत्र-मंत्राच्या सहाय्याने पैसे दुप्पट करण्याचा विधी करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून जादूटोणा करणारा ‘बैगा’ आणि त्याचे चार साथीदार अशा पाच जणांना ताब्यात घेतले. फार्महाऊसवरून काळ्या जादूचे साहित्य जप्त करण्यात आले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. कोरबाचे एस.पी. सिद्धार्थ तिवारी यांनी या प्रकरणाचा सर्वांगीण तपास करण्यासाठी विशेष पथक नेमले असल्याचे सांगितले.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी हा सरळ खून असल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला. मृतदेहांवर मारहाणीच्या खुणा असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित फार्महाऊसवर याआधीही अशा संशयास्पद जादूटोण्याचे प्रकार सुरू असल्याची चर्चा असून, या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

![]()




