जळगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपची सर्व ७५ जागांवर लढण्याची तयारी

 

जळगाव समाचार | १० डिसेंबर २०२५

जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांमध्ये ऐनवेळी युती फिस्कटल्याने अनेक ठिकाणी भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाची राष्ट्रवादी एकमेकांविरोधात उभी ठाकली होती. या पार्श्वभूमीवर जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत राहण्यावर भर देत भाजपची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत प्रदेश संघटन मंत्री विजय चौधरी यांनी “३६५ दिवस काम करणारा कार्यकर्ता भाजपकडे आहे. प्रत्येक बूथवर महापालिका निवडणुकीची तयारी आजपासून सुरू केली पाहिजे,” असे आवाहन करत केंद्र व राज्यातील योजनांचा जनसंपर्क वाढवण्याचे निर्देश दिले. विभागीय संघटन मंत्री रवी अनासपुरे यांनीही संघटनात्मक आढावा घेतला.

नागपूर हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने या बैठकीत निवडणूक रणनीतीवर विशेष चर्चा झाली. मित्र पक्षांशी युती झाली किंवा नाही झाली तरी सर्व ७५ जागांवर लढण्याची तयारी ठेवा, असे स्पष्ट निर्देश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. गेल्या निवडणुकीत भाजपने ५७ जागांवर विजय मिळवला होता, त्याची पुनरावृत्ती किंवा त्याहूनही चांगला निकाल मिळवण्यासाठी ३५८ बूथवर संघटन मजबूत करण्याचे ठरविण्यात आले. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भाजपचे जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आणि पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, भारती सोनवणे, सचिन पानपाटील, माजी महापौर सीमा भोळे तसेच भाजपचे सर्व महानगर पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, मागील कार्यकाळात नगरसेवकांच्या बंडखोरीमुळे सत्तेपासून दूर राहावे लागल्याचा अनुभव लक्षात घेऊन, यंदाच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा ठाम निर्णय भाजपकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अद्याप कोणताही अंतिम निर्णय न घेतल्याने संभाव्य बंडखोरांची चिंता वाढत चालली असून, भाजपने ‘बंडखोरांसाठी पक्षाचे दरवाजे बंदच’ असा स्पष्ट संदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here