तपोवनातील वृक्षतोडीवरून सयाजी शिंदे यांची महाजनांवर जोरदार टीका; “हैदराबादहून झाडे का आणता?”

 

जळगाव समाचार | १० डिसेंबर २०२५

तपोवनातील वृक्षतोडीच्या वादावरून अभिनेते सयाजी शिंदे यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा तीव्र शब्दांत टीका केली आहे. साधुग्राम व माईस हब उभारणीसाठी तपोवनातील १८२५ वृक्षतोडीचा प्रस्ताव पुढे आल्यानंतर स्थानिक पातळीवर मोठे आंदोलन उसळले. शेकडो नागरिक, संस्था आणि राजकीय पक्षांनी विरोध केला. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी तपोवन भेटीवेळी शिंदे यांनी “एकही वृक्ष तोडू देणार नाही” असा ठाम इशारा दिला होता.

दरम्यान, मंत्री महाजन यांनी नाशिक दौऱ्यात तपोवन परिसरातील दहा वर्षांखालील वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येईल आणि १५ हजार नवीन वृक्ष लावले जातील, अशी घोषणा केली. वड, पिंपळ, जांभूळ अशा देशी प्रजातींची १५ फूट उंच रोपे हैदराबादहून मागवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमासाठी खर्च सीएसआर निधीतून केला जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नव्या वृक्षांची योग्य देखभाल व निगा राखली जाईल, असेही महाजन यांनी नमूद केले.

मात्र, हैदराबादहून झाडे आणण्याच्या या निर्णयावरून सयाजी शिंदे यांनी मंत्री महाजन यांना थेट लक्ष्य केले. “महाराष्ट्रात वन विभाग नाही का? आपल्याकडे जागा, रोपे, माणसे आणि पैसा नाही का?” असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला. १५ फूट उंच झाडे लावणे आणि त्यांना जिवंत ठेवणे अत्यंत कठीण असते, योग्य तयारीशिवाय अशी लागवड यशस्वी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. “मंत्रीस्तरावरील व्यक्तींना हेही समजत नसेल तर काय?” असा टोला लगावत शिंदे यांनी शासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here