पोलीस हवालदारावर २० हजार लाच मागणीप्रकरणी गुन्हा; लाचलुचपत विभागाची कारवाई

 

जळगाव समाचार | १० डिसेंबर २०२५

जिल्ह्यात वाढत चाललेल्या लाचखोरीच्या प्रकरणांना नवीन उदाहरण मिळाले आहे. रावेर तालुक्यात एका केळी उत्पादक शेतकऱ्याकडून तब्बल २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. तक्रारदार शेतकऱ्याने दिल्ली येथील व्यापाऱ्याला सुमारे १ लाख २७ हजार रुपयांची केळी विकली होती. मात्र व्यापाऱ्याने रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने शेतकऱ्याने निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

तक्रार तपासासाठी शेतकऱ्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले असताना, तेथे कर्तव्यावर असलेल्या हवालदार पवार यांनी तक्रारीतील एकूण रकमेच्या १० टक्के, म्हणजेच २० हजार रुपये, लाच स्वरूपात मागितल्याचा आरोप आहे. शेतकऱ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सात ऑक्टोबर रोजी लेखी तक्रार केली. पंचांसमक्ष पडताळणीदरम्यान पवार यांनी निंभोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना देण्यासाठी २० हजार रुपये आवश्यक असल्याचे सांगून लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

हवालदार पवार यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने त्यांच्या विरोधात रावेर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, तसेच सापळा पथकातील सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, हवालदार किशोर महाजन, संगिता पवार, राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी आणि भूषण पाटील यांनी संयुक्तरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक ठाकूर करीत आहेत.

गेल्या आठवड्यातही धरणगाव येथे घरकुलाच्या रकमेचा दुसरा हप्ता देण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणीप्रकरणी पंचायत समितीतील कंत्राटी ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर गुन्हा दाखल झाला होता. सलग दोन प्रकरणांनी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील गैरकारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here