जळगाव समाचार | २६ नोव्हेंबर २०२५
जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी पात्र ठरलेल्या चार महिला उमेदवारांपैकी महाविकास आघाडीच्या तिन्ही उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने साधना महाजन यांच्या निवडीचा मार्ग अखेर मोकळा झाला. मात्र उमेदवारांना विश्वासात न घेतल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत असून, या नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
महाविकास आघाडीतर्फे दाखल करण्यात आलेल्या दोन अर्जांपैकी प्रतिभा संतोष झाल्टे यांचा मुख्य तर ज्योत्सना विसपुते यांचा डमी अर्ज होता. छाननीपूर्वीच ‘एकच सूचक’ असल्याच्या कारणावरून विसपुते यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यानंतर प्रतिभा झाल्टे यांनीही माघार घेतल्याने आघाडीचा एकही उमेदवार स्पर्धेत राहिला नाही. याचदरम्यान, निवडणूक आयोगाच्या सचिव आणि उपायुक्तांनी सूचकांची संख्या एकवरून पाच करण्याचा रात्रीतून घेतलेला निर्णय वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. आघाडीकडून अर्ज फेटाळण्यासाठी भाजपने खेळी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या निर्णयाविरोधात ज्योत्सना विसपुते यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अपील दाखल केले आहे. याच मुद्द्यावर जिल्ह्यातील पाचोरा येथेही अशीच कारवाई झालेल्या उमेदवाराला न्यायालयाने दिलासा दिल्याने, जामनेर प्रकरणालाही नवा ट्विस्ट मिळाला आहे. पाचोरा येथे भाजप उमेदवार अमरीन देशमुख यांचा अर्ज सूचक संख्येतील बदलामुळे नामंजूर झाला होता. त्यांनी दाखल केलेल्या अपीलवर न्यायालयाने त्यांचा अर्ज वैध ठरवला असून, निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा ठरला.
पाचोराप्रमाणेच या प्रकरणातही जामनेरमधील ज्योत्सना विसपुते यांना न्यायालयाकडून दिलासा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. साधना महाजन यांची बिनविरोध निवड निश्चित असली तरी, ‘सूचक’ वादामुळे निर्माण झालेला तणाव आणि न्यायालयीन लढाईमुळे जामनेरची नगराध्यक्ष निवडणूक आता आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.

![]()




