ममुराबाद बोगस कॉल सेंटर प्रकरणात मुख्य सूत्रधार अटकेत; २७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

 

जळगाव समाचार | २३ नोव्हेंबर २०२५

शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील एल.के. फार्महाऊसवर सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश झाल्यानंतर पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हेसह अनेकांना अटक केली होती. या छाप्यात ३१ लॅपटॉपसह अत्याधुनिक उपकरणे जप्त झाली असून, केंद्रातून मुख्यत्वे विदेशी नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले होते. कॉल सेंटरचे कर्मचारी स्वतःला अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवत डेटा तपासणीच्या किंवा विविध आमिषांच्या नावाखाली विदेशातील व्यक्तींना जाळ्यात ओढत असल्याचेही उघड झाले. शिवाय आर्थिक व्यवहाराचे पुरावेही पोलिसांना दोन लॅपटॉपवरून मिळाले होते.

दरम्यान, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार अकबर खान उर्फ अयान खान रौनकअली खान (४०) आणि त्याचा साथीदार आदिल सय्यद निसार अहमद सय्यद (३०) यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या संयुक्त पथकाने मुंबईतील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. संशयितांना शनिवारी जळगावात आणून न्यायालयात हजर केले असता, २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुख्य सूत्रधार हाती लागल्याने विदेशातील आणखी कोण सहभागी आहे का, जमा झालेली रक्कम कोणाच्या खात्यावर वळवली गेली, गुन्ह्यामागे आंतरराष्ट्रीय रॅकेट आहे का, हे उलगडण्यास तपासाला नवी दिशा मिळणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्यांची संख्या १० वर पोहोचली आहे.

अकबर, आदिल आणि ऋषी या तिघांचा शोध गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. संशयित मुंबईत ठाण मांडून असल्याच्या महितीनुसार पोलिसांनी अनेक वेळा मोहीमा राबवल्या, परंतु प्रयत्न निष्फळ ठरत होते. दरम्यान, इम्रान नावाचा एक संशयित पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मुंबईतील अनुभवी अधिकाऱ्यांच्या मदतीने संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आणि अखेर मुंबईच्या उपनगरातील एका फ्लॅटमध्ये अकबर आणि आदिल असल्याची खात्री झाल्यावर पथकाने त्वरित कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले. मुख्य सूत्रधार अटकेत आल्याने माजी महापौर ललित कोल्हे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यतादेखील व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here