जळगाव समाचार | १९ नोव्हेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील १६ नगर परिषद आणि दोन नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झाल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे अधिकच गडद झाली आहेत. मंगळवारी झालेल्या छाननीत नगराध्यक्षपदाचे तब्बल ६८ अर्ज, तर नगरसेवकपदाचे ९४५ हून अधिक अर्ज अवैध ठरले. छाननीनंतर नगराध्यक्षपदासाठी १७४, तर नगरसेवकपदासाठी २८९७ अर्ज वैध ठरले असून, २ डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी तगडी स्पर्धा रंगणार आहे.
युती-आघाड्यांमध्ये जागावाटपावरून झालेली रस्सीखेच, महायुतीतील तिन्ही पक्षांची काही ठिकाणी सांगड तर काही भागात अजित पवार–शिंदे गटांची शरद पवार–ठाकरे गटासोबत अनपेक्षित हातमिळवणी… अशा बदलत्या राजकीय समीकरणांमुळे अनेक ठिकाणी सरळ लढतीऐवजी चौरंगी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे राजकीय तापमान त्यामुळे चांगलेच वाढले आहे.
दरम्यान, रावेर तालुक्यातील सावदा येथे तीन अपत्य कायद्याचे उल्लंघन झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या दोन उमेदवारांचे अर्ज छाननीतच बाद झाले. प्रभाग क्रमांक १० (ब) मधील शेख अल्लाबक्ष शेख नजीर आणि प्रभाग क्रमांक २ (ब) मधील आसमाबी शेख अल्लाबक्ष यांच्या तक्रारींची तपासणी करताना दोघांनाही १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असल्याचे जन्मनोंदीतून सिद्ध झाले. प्रतिज्ञापत्रात दोन अपत्ये दाखवूनही जन्म नोंदवहीत तिसऱ्या अपत्याचा (जन्म १२ एप्रिल २०२०) उल्लेख असल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांचे अर्ज अवैध ठरविले.
या निर्णयाविरोधात संबंधित उमेदवारांना नामनिर्देशित यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील दाखल करण्याची मुभा आहे. मोठ्या प्रमाणातील अवैध अर्ज, चौरंगी लढती आणि अनपेक्षित आघाड्यांमुळे जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुका यंदा प्रचंड रंगतील, अशी स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.

![]()




