जळगाव समाचार विशेष | १८ नोव्हेंबर २०२५
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच नेतेमंडळींनी कार्यकर्त्यांना गोड शब्दांनी फुलवायला सुरुवात केली—“ही निवडणूक तुमची आहे, तुमच्यासाठी आम्ही लढणार!” प्रचारमंचावरून दिली जाणारी ही ग्वाही कार्यकर्त्यांच्या कानावर मधुर वाटत होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ जवळ येताच या गोड भाषणांचा सारा गोडवा वाफाळून गेला आणि उरला तो फक्त घराणेशाहीचा कडवट वास. ज्या कार्यकर्त्यांनी वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपली, तोंडओळख नसतानाही झेंडा खांद्यावर घेऊन पावसात, उन्हात पक्षाचा संदेश पोहोचवला—त्यांच्यावर पुन्हा एकदा सतरंज्या उचलण्याची वेळ आणणारे निर्णय नेत्यांनी अत्यंत थंडपणे घेतले.
जिल्ह्यातील १६ नगरपरिषद व २ नगरपंचायतींसाठी अर्जांचा पाऊस पडला; नगरसेवकांच्या ४६४ जागांसाठी तब्बल ३५४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले, तर नगराध्यक्षपदाच्या १८ जागांसाठी २२९ जणांनी स्पर्धा उभी केली. आकडेवारी जितकी चमकदार, तितकीच राजकारणातील ढोंगी गतिमानता अधिक स्पष्ट होत गेली. प्रभागांची रणधुमाळी, पक्षीय गणिते, युती-आघाड्यांची दुतोंडी भूमिका—या सर्वांचा परिणाम असा की, जमीनीवर रक्ताचे घाम गाळणारा कार्यकर्ता पुन्हा एकदा निर्णयप्रक्रियेच्या बाहेर फेकला गेला. कोणते गठबंधन कुठे झाले, कोणत्या ठिकाणी शत्रू मित्र झाले आणि कोणत्या गावात मित्रच शत्रू बनले—या गोंधळात कार्यकर्ते फक्त पायदळी तुडवले गेले.
नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये मात्र कार्यकर्त्यांचे महत्व वारंवार अधोरेखित केले गेले. “युती तुटली तर कार्यकर्ते मरून जातील”, “कार्यकर्त्यांशिवाय संघटना नाही”—असे भावनिक सूर लावून कार्यकर्त्यांच्या भावविश्वाशी खेळ सुरू राहिला. पण अर्ज दाखल करण्याच्या निर्णायक क्षणी बहुतेक नेत्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवण्याऐवजी थेट आपल्या सौभाग्यवती, मुली, सून किंवा घरातील सदस्यांना पुढे करून पत्ते उघड केले. या कृतीने जनतेत आणि पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. नेत्यांनी उभारलेली युती, आघाड्या आणि त्यांचे धोरणात्मक शब्द सर्वांचेच पडदे फाडून एक कटू वास्तव समोर आले—स्थानिक स्वराज्य हे लोकशाहीचे पहिले पाऊल नसून घराणेशाहीचा पहिला पाया बनले आहे.
जामनेरमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या सौभाग्यवती साधना महाजन, भुसावळमध्ये मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, चाळीसगावमध्ये आमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी प्रतिभा चव्हाण आणि माजी आमदार राजीव देशमुख यांच्या पत्नी पद्मजा देशमुख, पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील यांच्या सौभाग्यवती सुनिता पाटील आणि माजी आमदार दिलीप वाघ यांच्या सौभाग्यवती सुचेता पाटील, तर मुक्ताईनगरात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील—ही नावे पाहिली की एकच प्रश्न घोळत राहतो : हा राजकीय प्रवास जनतेचा आहे की फक्त घराणेशाहीचा वारसा पुढे नेण्यासाठी आखलेला मार्ग?
ज्या कार्यकर्त्यांवर पक्षाची पायाभरणी उभी आहे, त्यांचीच स्वप्ने या उमेदवारींच्या खेळात चिरडली जात आहेत. निवडणूक प्रचाराआधी आश्वासनांचे गोडवे ऐकवणारे नेते, प्रत्यक्षात मात्र स्वतःच्या घराची राजकीय दिवाळी पेटवण्यावरच भर देत आहेत. जिल्ह्यातील निवडणुका आता जनतेचे सक्षमीकरण न राहता काही घराण्यांचे “राजकीय गृहकार्य” बनू लागल्या आहेत—आणि यामध्ये सर्वात मोठा पराभव हा पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांचा होत आहे, ज्यांचा हात उघड्याच निवडणुकीच्या रणांगणात उभा आहे.

![]()




