जळगावात अंगावर गरम पाणी पडून जखमी चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू

 

जळगाव समाचार | १५ नोव्हेंबर २०२५

जळगावातील वाटिका आश्रम परिसरात घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक घटनेत चार वर्षीय चेतन जितेंद्र पाटील या चिमुकल्याचा गरम पाण्याने भाजल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवार, १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. एस.टी. वर्कशॉपमध्ये कार्यरत असलेल्या जितेंद्र पाटील यांच्या कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या अपघातात चेतन घरी खेळत असताना त्याने आईकडे कांदेपोहे खाण्याचा हट्ट केला. त्याची आई स्वयंपाकाची तयारी करत असताना चेतन खेळता खेळता बाथरूममध्ये गेला, जिथे एका बादलीत गरम पाणी ठेवलेले होते. दुर्दैवाने खेळताना ते गरम पाणी त्याच्या अंगावर पडले आणि तो गंभीररित्या भाजला. तातडीने त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र भाजण्याच्या स्वरूपामुळे त्याच्या जखमा अधिक गंभीर होत गेल्या आणि प्रकृती चिंताजनक बनत गेली. सर्व प्रयत्नांनंतरही बुधवार दुपारी चेतनची प्राणज्योत मालवली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून पाटील कुटुंबावर दु:खाचा मोठा आघात झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here