जळगाव समाचार | १४ नोव्हेंबर २०२५
मराठी संस्कृती, परंपरा आणि लोककलांची महती राज्यातील बालकांपर्यंत पोहोचावी तसेच कलाक्षेत्रात त्यांची रुची, कौशल्य आणि संवर्धन वाढावे या उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी ‘जल्लोष लोककलेचा’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाचा महोत्सव जळगाव शाखेतर्फे ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात दि. २८ व २९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. लोककलांचा समृद्ध वारसा लाभलेल्या महाराष्ट्रातील कलांचे केवळ मनोरंजनात्मक स्वरूप न राहता त्या कलेची जाण बालकांना मिळावी, त्यांच्या कलात्मक विकासाला दिशा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
या द्विदिवसीय महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत गायन, एकल लोकनृत्य, एकल लोकगीत गायन व लोकवाद्य वादन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धक बालकलावंतांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून उत्कृष्ट कलाविष्कारासाठी आकर्षक पारितोषिकेही जाहीर करण्यात आली आहेत. समूह लोकनृत्य व समूह लोकगीत गायन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट गटाला ४,००० रुपये, उत्कृष्ट गटाला ३,००० रुपये, उत्तम गटाला २,००० रुपये तर प्रशंसनीय कलाविष्कारासाठी १,००० रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे एकल लोकगीत गायन, लोकवाद्य वादन व लोकनृत्य स्पर्धेत सर्वोत्कृष्ट विजेत्याला २,००० रुपये, उत्कृष्टला १,५०० रुपये, उत्तमला १,००० रुपये आणि प्रशंसनीय क्रमांकासाठी ५०० रुपये असे पारितोषिक देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील बालकलावंतांना या महोत्सवासाठी आपल्या विद्यालयामार्फत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले असून यासाठी योगेश शुक्ल (9657701792), सचिन महाजन (7620933294), हर्षल पवार (8830256068), मोहित पाटील (9067304797) आणि आकाश बाविस्कर (9130343656) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बालरंगभूमी परिषद, जळगाव शाखेतर्फे करण्यात आले आहे.

![]()




