जळगाव समाचार | १२ नोव्हेंबर २०२५
जळगाव विमानतळाला राज्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या विमानतळाचा मान मिळाला असून, केंद्र सरकारने येथील पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या विमानतळावरील सेवांचा विस्तार करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. सध्या येथून गोवा, हैदराबाद, पुणे आणि मुंबई या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा सुरू असून, हवाई प्रशिक्षण केंद्रही कार्यरत आहे. तथापि, एकाच पाळीत कामकाज आणि अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने, विमानतळाच्या सर्वांगीण विकासाची मागणी होत होती.
या पार्श्वभूमीवर खासदार स्मिता वाघ यांनी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांच्याकडे तांत्रिक व आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता जळगाव विमानतळावर दोन एटीआर ७२ आणि एक लेगसी ६५० विमान पार्किंगसाठी सक्षम ॲप्रन तयार केला जाणार आहे. तसेच आधुनिक सोयी-सुविधायुक्त टर्मिनल इमारत, १५० प्रवासी क्षमतेची बैठक व्यवस्था, १०० मोटारींचा वाहनतळ, कन्व्हेयर बेल्ट, वैद्यकीय तपासणी कक्ष, अतिरिक्त चेक-इन काउंटर, खाद्यपदार्थ दुकाने आणि बालसंगोपन कक्ष उभारण्याचा प्रस्ताव आहे.
सध्या विमानतळावर स्वतंत्र मालवाहतूक (कार्गो) सेवा नसल्याने प्रवासी विमानांद्वारे मर्यादित प्रमाणात मालाची वाहतूक होते. मात्र, नवीन कार्गो टर्मिनल सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना केळीसह इतर शेतीमालाची निर्यात मोठ्या प्रमाणात करता येणार आहे. दरम्यान, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि विमानतळ संचालक हर्ष त्रिपाठी सहभागी झाले होते. बैठकीत विमानतळावरील सध्याच्या सुविधा, एअरलाईन्स कनेक्टीव्हिटी, विस्तार योजना तसेच रेल्वे व महामार्ग सुविधांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

![]()




