चोपड्यात भाजपचा शरद पवार गटाला धक्का; स्थानिक निवडणुकांची रंगत वाढली…

 

जळगाव समाचार | ८ नोव्हेंबर २०२५

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजल्यानंतर भाजप पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आलेली दिसत आहे. बहुमताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी महाविकास आघाडीला धक्का देण्याची रणनीती मंत्री गिरीश महाजन यांनी आखली असून, त्याचाच एक भाग म्हणून चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला मोठा फटका बसला आहे. भाजपच्या जिल्हास्तरीय तयारी बैठकीत या हालचालींना विशेष गती मिळाली.

साकेगाव (ता. भुसावळ) येथे पार पडलेल्या पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीत महाजन यांनी नगरपालिका, नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवरील राजकीय समीकरणांचा सविस्तर आढावा घेतला. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे तसेच आगामी निवडणुकांमध्ये विजय सुनिश्चित करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बैठकित वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, जळगावचे आमदार सुरेश भोळे, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, रावेरचे आमदार अमोल जावळे, भाजप जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिमचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

याच बैठकीत चोपड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे माजी नगराध्यक्ष जीवन चौधरी यांनी सहकाऱ्यांसह भाजप प्रवेश केला. यामुळे चोपडा तालुक्यात भाजपची संघटना अधिक सक्षम होणार असल्याचा विश्वास मंत्री महाजन यांनी व्यक्त केला. यापूर्वी चोपडा विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे प्रभाकर सोनवणे यांनीही भाजपमध्ये पुनरागमन केले असून, यामुळे चोपडा परिसरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. भाजपने शिंदे गटाला रोखण्यासाठी रणनीती अधिक कडक केल्याचे संकेत मिळत आहेत.

जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने उल्लेखनीय यश मिळवले होते. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा विजयाची दिशा मजबूत करण्यासाठी महाजन यांनी कार्यक्षम, जनतेशी जोडलेले आणि नव्या ऊर्जा असलेल्या कार्यकर्त्यांना पुढे आणण्यावर भर दिला आहे. भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात युती होणार की स्वतंत्रपणे निवडणूक लढवली जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी जिल्ह्यातील भाजपमध्ये नवचैतन्य आणि तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची लाट जाणवू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here