जळगाव राजकीय उलथापालथ; कालच्या घटनेला सुरेश जैन यांचा अप्रत्यक्ष आशीर्वाद?

 

जळगाव समाचार | १ नोव्हेंबर २०२५

शहरातील राजकारणात मोठी उलथापालथ घडवत शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) दोन माजी महापौरांसह डझनभर माजी नगरसेवकांनी शुक्रवारी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपची ताकद अधिक भक्कम झाली असून, हा प्रवेश माजी मंत्री सुरेश जैन यांच्या गुप्त आशीर्वादानेच झाल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

एकेकाळी शिवसेनेशी संलग्न असतानाही माजी मंत्री सुरेश जैन यांच्या समर्थकांनी जळगाव नगरपालिकेपासून ते महापालिकेपर्यंतच्या निवडणुका ‘खान्देश विकास आघाडी’ या स्वतंत्र आघाडीच्या बॅनरखाली लढवल्या. त्यामुळे शिवसेनेला मुस्लीमबहुल आणि बिगरहिंदू मतदारसंघांमध्येही मोठा पाठिंबा मिळत असे. सत्ता नावाने शिवसेनेची असली तरी सूत्रे मात्र खान्देश विकास आघाडीच्या नेत्यांकडे असत, अशी त्या काळातील परिस्थिती होती.

मात्र, या दुहेरी समीकरणामुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी शिवसेनेच्या तत्कालीन नेतृत्वाने २०१८ च्या महापालिका निवडणुकीत महत्त्वाचा निर्णय घेतला. या वेळी निवडणूक खान्देश विकास आघाडीच्या नव्हे, तर थेट शिवसेनेच्या अधिकृत ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढवण्याचा आदेश देण्यात आला. तथापि, या निर्णयाचा उलट परिणाम झाला — बिगरहिंदू मतदारांचा पाठिंबा गमावल्याने शिवसेनेला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले. परिणामी, संघटनात्मक रचना आणि आगामी निवडणुकांचे गणित दोन्ही ढासळले.

या निवडणुकीत भाजपने मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ५७ जागा जिंकत महापालिकेवर सत्ता मिळवली. यानंतर सुरेश जैन यांनी सक्रिय राजकारणातून काहीसे बाजूला घेतले. त्यांच्या समर्थकांनी मात्र ठाकरे गटात स्थिरावून स्थानिक राजकारणात आपला प्रभाव टिकवून ठेवला. या दरम्यान शिवसेनेतील सुनील महाजन यांसारख्या तरुण नेतृत्वाने काही भाजप नगरसेवकांना फोडून महापालिकेची सत्ता उलथवून लावली होती. त्यामुळे भाजपला बहुमत असूनही विरोधी बाकावर बसावे लागले, हा प्रसंग पक्षासाठी मोठा धक्का ठरला.

याच पार्श्वभूमीवर, “त्या पराभवाचा हिशेब चुकता करण्यासाठी” भाजपने अचूक राजकीय खेळी आखत ठाकरे गटातील जैन समर्थक दोन माजी महापौर आणि डझनभर माजी नगरसेवकांना आपल्या गोटात सामील करून घेतले आहेत. या प्रवेशामुळे निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय समीकरणे नव्याने आखली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, या घडामोडीसाठी मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः माजी मंत्री सुरेश जैन यांची दीर्घ मनधरणी केली. जवळपास सहा महिन्यांपासून या प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. अखेर जैन यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरच त्यांच्या कट्टर समर्थकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

यापूर्वी माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी “आमचे नेते सुरेश जैन सांगतील तेव्हाच पुढील निर्णय होईल” असे विधान केले होते, जे या संपूर्ण घडामोडीचे संकेत मानले जात होते. शेवटी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जळगावच्या राजकीय पटावर नवीन समीकरण निर्माण केले आहे.

या हालचालीमुळे ठाकरे गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला त्याचा थेट फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here