फिर्यादीचाच ड्रायव्हर निघाला सूत्रधार! भुसावळ तालुक्यातील २५ लाखांच्या लुटीचा दोन दिवसांत पर्दाफाश – सहा जणांना अटक

जळगाव समाचार | १ नोव्हेंबर २०२५

भुसावळ तालुका पोलिसांनी तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा (गु.क्र. २०७/२०२५) अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश करत सहा आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २३ लाख ४२ हजार रुपये रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत. तपासात या गुन्ह्याचा सूत्रधार हा फिर्यादीच्या कंपनीतीलच ड्रायव्हर असल्याचे उघड झाले आहे.

घटनेचा तपशील असा की, २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०:२० वाजता मोहम्मद यासीन ईस्माईल हे आपल्या कार्यालयातील २५ लाख ४२ हजार रुपये एका बॅगेत घेऊन मोटारसायकल (एमएच-१९-बीसी-५५८६) वरून घरी जात होते. दरम्यान, मौजे खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटारसायकलला धक्का दिला. त्यामुळे तोल गेल्याने ईस्माईल खाली पडले आणि आरोपींनी मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग हिसकावून घेत मोटारसायकलवरून पसार झाले.

या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. तपासादरम्यान फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यानेच हा गुन्हा रचल्याचे कबूल केले.

शाहीद बेग हा ‘रॉयल कंपनी’मध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत असून, पैशांच्या ने-आण वेळेबाबतची अचूक माहिती त्याला होती. त्यानेच अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे असलेल्या रकमेची माहिती आपल्या साथीदारांना दिली. त्याच्या सांगण्यावरून मुजाहीद मलीक व मोहम्मद दानिश या दोघांनी हा प्लॅन तयार केला आणि रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि ईजहार बेग इरफान बेग या तिघांना प्रत्यक्ष लुटीचे काम सोपवले. २८ ऑक्टोबरच्या रात्री या तिघांनी घटनास्थळी पोहोचून लुटीची अंमलबजावणी केली.

तपासात पुढे हे स्पष्ट झाले की आरोपींनी एकत्र येऊन संगनमताने कट रचून हा दरोडा टाकला आहे. त्यामुळे गुन्ह्यात भारतीय दंडसंहितेतील कलम ३१० (२) (दरोडा) हे वाढीव कलम लावण्यात आले. पोलिसांनी ३१ ऑक्टोबर रोजी सर्व सहा आरोपींना अटक केली. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत — शाहीद बेग इब्राहिम बेग (२५, भुसावळ), मुजाहीद आसीफ मलीक (२०, भुसावळ), मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (१९, भुसावळ), अजहर फरीद मलक (२४, रसलपूर), अमीर खान युनुस खान (२४, रसलपूर) आणि ईजहार बेग इरफान बेग (२३, रसलपूर).

या आरोपींपैकी काहींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचेही समोर आले आहे. शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे नोंद आहेत, तर अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी आरोपींकडून २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि लुटीत वापरलेली मोटारसायकल हस्तगत केली असून उर्वरित दोन लाख रुपयांची रक्कम शोधण्याचे काम सुरू आहे. सर्व आरोपींना ३ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड (भुसावळ तालुका पोलीस ठाणे) करत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड (स्थानीय गुन्हे शाखा, जळगाव), पोलीस निरीक्षक राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे) आणि महेश गायकवाड यांच्या पथकांनी केली.

तपास पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रेमचंद सपकाळे, नाईक पोलीस श्रीकृष्ण देशमुख, विकास सातदिवे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे (स्था. गु. शा. जळगाव), श्रीमती पूजा अंधारे, पो. हे. कॉ. संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, जितू ठाकरे (भुसावळ तालुका), योगेश माळी, भुषण चौधरी, अमर अढाळे, प्रशांत सोनार (भुसावळ बाजारपेठ) आणि प्रमोद पाटील (रावेर) यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here