जळगाव समाचार | २८ ऑक्टोबर २०२५
जळगाव शहरातील शिवराम नगर भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या ‘मुक्ताई’ बंगल्यात चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, गेल्या महिन्यातच खडसे यांची सून आणि राज्य मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडली होती. त्या घटनेचे पडसाद अद्याप ओसरायचे नाहीत, तोच आता त्यांच्या जळगावमधील निवासस्थानी झालेल्या या चोरीने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताई नगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील ‘मुक्ताई’ बंगल्यावर काही दिवसांपासून कुलूप होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी बंगल्यावर आले असता दाराचे कुलूप तुटलेले आढळले. आत प्रवेश करून पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसले आणि चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. कर्मचाऱ्यांनी तत्काळ खडसे यांना माहिती देताच पोलिसांना घटनेची कल्पना देण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला असून चोरीत नेमके किती नुकसान झाले आणि कोणत्या वस्तू चोरीला गेल्या, याचा तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका प्रमुख राजकीय नेत्याच्या निवासस्थानी झालेल्या या घटनेमुळे शहराच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

![]()




