जळगाव शहरात नयनतारा मॉलमधील वॉशरूममध्ये तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्रण; पोलिसांकडून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल…

जळगाव समाचार | २७ ऑक्टोबर २०२५

शहरातील नयनतारा मॉलमध्ये एका १९ वर्षीय तरुणीचे वॉशरूममध्ये आक्षेपार्ह छायाचित्रण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथील रहिवासी असून, दिवाळीच्या निमित्ताने ती आपल्या आजोळी जळगावला आली होती. शुक्रवारी (२४ ऑक्टोबर) सायंकाळी ती आई व मावशीसोबत नयनतारा मॉलमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गेली असता, चित्रपट सुरू असताना ती वॉशरूममध्ये गेली. त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने तिचा आक्षेपार्ह व्हिडिओ काढला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तरुणीने तत्काळ आपल्या आई-मावशीला माहिती दिली व तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे. मॉलसारख्या गर्दीच्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणी असा प्रकार घडल्याने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मॉल संस्कृती आधुनिक जीवनशैलीचा भाग बनली असली तरी गोपनीयता आणि सुरक्षेचा अभाव चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे मॉल व्यवस्थापनाने अधिक कठोर सुरक्षा उपाययोजना व प्रभावी सीसीटीव्ही देखरेख व्यवस्था राबविण्याची मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here