जळगाव समाचार | २७ ऑक्टोबर २०२५
धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाट हा राज्यातील सर्वाधिक धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षांपासून या घाटावर अपघात, वाहतूक कोंडी आणि विलंबाचे प्रमाण वाढले होते. वाहनचालकांचा त्रास लक्षात घेऊन केंद्र सरकारने अखेर या घाटावरून जाणाऱ्या मार्गासाठी ५.५० किलोमीटर लांबीच्या अत्याधुनिक बोगद्याच्या बांधकामास मंजुरी दिली आहे. सुमारे ₹२,४३५ कोटी खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे टेलवाडी ते बोधरे या १५ किलोमीटरच्या टप्प्यात वाहतूक अधिक सुरक्षित, सुलभ आणि जलद होणार आहे.
खासदार स्मिता वाघ यांनी सांगितले की, “औट्रम घाट आता इतिहासजमा होणार आहे.” अनेक अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत होता. घाटाऐवजी सुरक्षित बोगद्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. या मागणीसंदर्भात वारंवार केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केल्यानंतर अखेर केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्याने जनतेची अपेक्षा पूर्ण झाली आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या विकास प्रवासातील ऐतिहासिक टप्पा ठरणार असल्याचे खासदार वाघ यांनी नमूद केले.
या प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सडक वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे आधुनिकीकरण वेगाने होत असल्याचे खासदार वाघ यांनी सांगितले. बोगद्याच्या उभारणीमुळे इंधन बचत, प्रवास वेळेत कपात, अपघातांमध्ये घट आणि पर्यावरणावरचा ताण कमी होणार आहे. या प्रकल्पासाठी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार स्मिता वाघ आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
प्रकल्पाचे तांत्रिक तपशील:
बोगद्याची लांबी ५.५० किलोमीटर असून, टेलवाडी ते बोधरे या १५ किलोमीटर टप्प्यात तो उभारला जाणार आहे. या प्रकल्पावर एकूण ₹२,४३५ कोटी खर्च अपेक्षित आहे. वाहनांचा वेग ताशी १०० किलोमीटरपर्यंत राखला जाईल. बोगदा डबल ट्यूब स्ट्रक्चर पद्धतीने उभारला जाणार असून, त्यात अत्याधुनिक वायुवीजन व्यवस्था, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, फायर सिस्टिम, डिजिटल सेन्सर, सीसीटीव्ही आणि वाहन नियंत्रण केंद्र अशी सर्व सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार आहे.

![]()




