आरएसएसला संविधान, तिरंगा आणि नोंदणी कायदा भेट देत वंचितचा निषेध मोर्चा…

 

जळगाव समाचार | २५ ऑक्टोबर २०२५

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगरात मोठा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. वंचित आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संघाचे कार्यालय असलेल्या प्रल्हाद भवन (एम्प्लॉयमेंट चौकासमोर) येथे पोहोचून संविधानाची प्रत, तिरंगा आणि नोंदणीविषयक कायदा संघाला प्रतीकात्मक भेट दिली. या माध्यमातून संघाच्या विचारसरणीचा निषेध नोंदवण्यात आला.

सुजात आंबेडकर यांनी यावेळी इशारा दिला की, “जर संघाने संविधानविरोधी कामकाज सुरूच ठेवले, तर पुढील मोर्चा थेट रेशीमबाग मुख्यालयावर नेण्यात येईल.”

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा अदालत रोडवरच पोलिसांनी अडवला. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत तेथेच सभा घेतली. “अरे उठा उठा रे, बहुजनांनी मशाल पेटवू एकीची” या गीताने परिसरात उत्साह निर्माण झाला.

अलीकडेच शहरातील एका महाविद्यालय परिसरात आरएसएसच्या सदस्य नोंदणीला विरोध केल्याप्रकरणी राहुल मकासरे आणि विजय वाहूळ या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत आणि संघाच्या अशा नोंदणी मोहिमा बंद कराव्यात, या मागण्यांचा मोर्चेकऱ्यांनी ठाम आग्रह धरला.

मोर्चात सुजात आंबेडकर यांच्यासोबत फारुख अहमद, सिद्धार्थ मोकळे, अमित भुईगळ, डॉ. नितीन ढेपे, शेख तय्यब, समिभा पाटील, सतीश गायकवाड, जावेद कुरेशी, अफसर खान, पंकज बनसोडे यांच्यासह राज्यभरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध आंबेडकरी संघटनांचे नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वंचितचा मोर्चा असला तरी पक्षभेद विसरून विविध आंबेडकरी संघटनांनी यात सहभाग नोंदवला.

क्रांती चौक परिसरात ‘आरएसएस मुर्दाबाद, संविधान जिंदाबाद’च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले. शासकीय कर्मचारी निवासस्थानाजवळ बॅरिकेडिंग करून रस्ता अडवण्यात आला होता. बॅरिकेडिंगच्या पुढे शीघ्रकृती दलाचे जवान तैनात होते. थोडी लोटालोटी झाली असली तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

शिष्टमंडळ प्रल्हाद भवनापर्यंत पोहोचल्यावर पोलिसांनी आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांना येण्याचे आमंत्रण दिले, मात्र कोणीही उपस्थित राहिले नाही. शेवटी पोलिस उपायुक्त पंकज अतुलकर यांच्या माध्यमातून संविधानाची प्रत, तिरंगा आणि नोंदणी कायद्याची प्रत सुपुर्द करण्यात आली.

मोर्चाच्या अखेरीस रवी तायडे यांनी आभारप्रदर्शन केले. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण मोर्चा शांततामय वातावरणात पार पडला, मात्र पुढील टप्प्यात रेशीमबागकडे मोर्चा काढण्याचा इशारा देत वंचित कार्यकर्त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here