जळगाव समाचार | २४ ऑक्टोबर २०२५
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजण्यापूर्वीच महायुतीच्या घटक पक्षांमध्ये स्वबळावर लढण्याची चढाओढ सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन्ही पक्षांनी युतीच्या चर्चेला बगल देत स्वतंत्रपणे रणांगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांनीदेखील स्वबळाचा नारा देत कार्यकर्त्यांना तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत. महाजन यांनी “कोणी कसाही असला तरी पक्षात घ्या” असा आदेश दिल्याने भाजपने स्थानिक पातळीवर ‘विजयासाठी सर्व काही योग्य’ अशी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विरोधात लढणाऱ्यांना पक्षात न घेण्याचा निर्णय तिन्ही घटक पक्षांनी घेतला असला, तरी आता त्यालाच तिलांजली देण्यात आली आहे. गुलाबराव पाटील यांनी ‘प्रवेशासाठी चाळणी आवश्यक’ असा आग्रह धरला होता, मात्र प्रत्यक्षात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तिन्ही पक्षांनीच विरोधात लढलेल्यांना खुले दरवाजे दाखवले आहेत. त्यामुळे पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक गणित आणि मताधिक्य हेच प्रमुख निकष बनले आहेत.
या घडामोडींमुळे पाचोरा आणि अमळनेर तालुक्यांपासूनच ‘स्वबळ’ च्या राजकारणाला रंग चढू लागला आहे. भाजपने पाचोऱ्यात शिंदे गटाच्या आमदारांचे विरोधक आपल्या गोटात ओढून आगीत तेल ओतले असून, अमळनेरमध्ये शिंदे गटाने माजी आमदार शिरीष चौधरी यांना पक्षात घेत भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. या हालचालींमुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये महायुतीतील असंतोष उफाळण्याची शक्यता निर्माण झाली असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीसाठी कसोटी ठरणार आहेत.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) हालचाली मात्र तुलनेने संयमित दिसत आहेत. शरद पवार गटातील दोन माजी मंत्री, दोन माजी आमदार आणि काँग्रेसच्या प्रतिभा शिंदे यांना पक्षात सामील करून सुरुवातीला जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यानंतर आता त्या गटातील गती मंदावली आहे. जिल्ह्यात युती होते की नाही, याकडे लक्ष ठेवत स्थानिक नेते संभाव्य उमेदवारांची मांडणी करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मित्र विरुद्ध मित्र’ अशी परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

![]()




