जळगाव समाचार | २३ ऑक्टोबर २०२५
जिल्ह्यातील शेतकरी सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, पाडव्याच्या दिवशी बुधवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. दुपारी चारच्या सुमारास जळगावसह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. खरीप हंगामातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी नव्या हंगामाची तयारी केली असली, तरी हवामानाच्या या अनिश्चिततेने त्यांच्या चिंतेत भर घातली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मूग, उडीद आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शासनाच्या मदतीची रक्कम अद्याप अनेकांच्या खात्यात जमा झालेली नाही.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप, तसेच केरळ आणि दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्याचबरोबर दक्षिण अंदमान समुद्र परिसरात आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे सरकत आहे. या प्रणालींची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि ढगाळ हवामानामुळे पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. जिल्ह्यातील वाढत्या उकाड्यामुळे अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या असून, पहाटेचा गारवा वाढल्याने हवामानात अस्थिरता जाणवत आहे.
दरम्यान, जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात ज्वारी, हरभरा, मका यांसारखी कोरडवाहू आणि बागायती पिकांची पेरणी साधारणपणे दसरा-दिवाळीच्या सुमारास पूर्ण होते. मात्र यंदा परतीच्या पावसाचा जोर जास्त राहिल्याने पेरणीला आधीच विलंब झाला आहे. तरीही, हवामानात थोडी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी सुरू केली आहे. मात्र दिवाळीतच पुन्हा पावसाच्या सरी बरसल्याने जमिनीतील वाफसा स्थिती बिघडण्याची आणि पेरणी आणखी लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नियोजन पुन्हा कोलमडण्याची शक्यता असून, त्यांच्यासमोर निसर्गाचा आणखी एक आव्हानात्मक टप्पा उभा राहिला आहे.

![]()




