मोठी बातमी: अवघ्या ६ मिनिटांत सोन्याची गच्छंती, चांदीची चमकही फिकट; ऐन दिवाळीत सोनं ७,७०० आणि चांदी २६,५०० ने स्वस्त…

 

जळगाव समाचार | २२ ऑक्टोबर २०२५

सणासुदीच्या काळात गुंतवणूकदारांनी केलेल्या नफा बुकिंग आणि मागणीत झालेल्या घटेमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. देशातील मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये बुधवारी सोन्याच्या दरात अवघ्या सहा मिनिटांत तब्बल सहा टक्क्यांनी म्हणजेच ७,७०० रुपयांची घसरण नोंदवली गेली. तज्ज्ञांच्या मते, आगामी काही दिवसांतही सोन्याच्या भावात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

गेल्या शुक्रवारी सोन्याचा भाव विक्रमी १,३२,२९४ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. मात्र बुधवारी तो घसरून १,२०,५७५ रुपयांवर आला. सांयकाळच्या सुमारास ५.४० वाजता सोन्याचा दर आणखी घसरून १,२१,११८ रुपयांवर पोहोचला. मंगळवारी सोन्याचा भाव १,२८,२७१ रुपये होता, म्हणजेच फक्त एका दिवसात सोन्याच्या दरात सुमारे ७,६९६ रुपयांची घसरण झाली. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार वायदा बाजारात सोन्याचा दर १.१० लाख ते १.१५ लाख रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो.

सोन्याबरोबरच चांदीतही मोठी घसरण नोंदवली गेली आहे. भारतीय वायदा बाजारात चांदीचा दर बुधवारी ४ टक्क्यांनी घसरून १.४४ लाख रुपयांवर आला. दिवसाच्या व्यापार सत्रादरम्यान चांदीचा भाव १,४३,८११ रुपयांपर्यंत खाली गेला. संध्याकाळी ५ वाजता चांदीचा सुरुवातीचा दर १,४८,००० रुपये होता, जो दिवसअखेर १,५०,३२७ रुपयांवर बंद झाला.

गेल्या शुक्रवारी चांदीचा विक्रमी दर १,७०,४१५ रुपये प्रति किलो इतका होता. त्या तुलनेत बुधवारी चांदीच्या दरात तब्बल २६,५९६ रुपयांची म्हणजेच ६ टक्क्यांची घसरण झाली आहे. सोन्या-चांदीच्या किमतींतील ही अचानक झालेली घसरण सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी दिलासादायक ठरली असली, तरी गुंतवणूकदारांसाठी चिंतेचे कारण बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here