जळगाव समाचार | २२ ऑक्टोबर २०२५
दिवाळीच्या उत्साहात आणि गोवर्धन पूजेच्या शुभमुहूर्तावर आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात ऐतिहासिक घसरण नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील तब्बल १२ वर्षांतील विक्रमी घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही स्पष्टपणे दिसून आला आहे. चांदीच्या दरात तब्बल १० हजार ५४९ रुपयांची घसरण झाली असून, सोन्याचाही भाव ३ हजार ७२५ रुपयांनी खाली आला आहे. या अनपेक्षित घसरणीमुळे गुंतवणूकदार आणि व्यापारी दोघेही चिंतेत पडले आहेत.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीशिवाय १,२३,९०७ रुपये प्रति १० ग्रॅम नोंदवला गेला, तर चांदी १,५२,५०१ रुपये प्रति किलोवर आली आहे. जीएसटीसह सोन्याचा दर १,२७,६२४ रुपये आणि चांदीचा दर १,५७,०७६ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. २३ कॅरेट सोन्याचा दर ३४१३ रुपयांनी कमी होऊन १,२३,४११ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे, तर २२ कॅरेट सोने १,१३,४९९ रुपये आणि १८ कॅरेट सोने ९२,९३० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.
सोन्या-चांदीच्या या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणांची मालिका आहे. अमेरिका आणि चीनमधील सकारात्मक व्यापार चर्चा, डॉलरची मजबूती, तसेच तांत्रिक पातळीवर झालेली मोठी वाढ या घटकांचा थेट परिणाम दरावर झाला आहे. याशिवाय भारतातील हंगामी मागणी कमी झाल्यामुळेही बाजारात दबाव निर्माण झाला. सणासुदीच्या काळात अशी घसरण होणे दुर्मिळ असल्याने गुंतवणूकदार साशंक असून, पुढील काही दिवसांतील आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

![]()



