जळगाव समाचार | २० ऑक्टोबर २०२५
राज्यात आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत तीव्र इशारा दिला. “मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांच्या मतदार याद्यांमध्ये तब्बल ९६ लाख बोगस मतदार घुसविण्यात आले आहेत. जोपर्यंत या याद्या स्वच्छ होत नाहीत आणि सर्व पक्षांना मान्य होत नाहीत, तोवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही,” असे ठाकरे म्हणाले.
गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये पार पडलेल्या मनसेच्या मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी ‘लाव रे तो व्हिडीओ’च्या माध्यमातून ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकार तसेच अदानी–अंबानी समूहावरही थेट हल्ला चढवला. “मतदार याद्यांतील दोषांवर आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला, तर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात? कारण त्यांनीच हा डाव आखला आहे,” असा आरोप करत ठाकरे म्हणाले, “काही आमदारांनी स्वतः मान्य केले की त्यांच्या मतदारसंघात २० ते २५ हजार बाहेरील मतदार दाखल करण्यात आले.”
मराठी अस्मितेचा मुद्दा मांडताना ठाकरे म्हणाले, “मी प्रगतीच्या आड येणारा माणूस नाही. पण मुंबई आणि महाराष्ट्राची प्रगती जर मराठी माणसाच्या थडग्यावर उभी राहणार असेल, तर ती खपवून घेणार नाही. काही उद्योगपती ‘जिथे नजर पडेल ते आमचंच’ अशा भूमिकेत आहेत, आणि दुर्दैवाने त्यांना आपल्या मराठी माणसांचीच साथ मिळते आहे.” त्यांनी सत्ताधाऱ्यांवर ‘जिल्हा परिषद आणि महापालिकाही ताब्यात घेण्याचा मोठा डाव आखल्याचा’ गंभीर आरोपही केला.
राज ठाकरे यांनी पुढे स्पष्ट केले की, मनसे तसेच महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर मतदार याद्यांच्या तपासणीची मोहीम सुरू करण्यात येणार आहे. “मतदार याद्या दुरुस्त आणि शुद्ध झाल्याशिवाय कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही,” असा ठाम इशारा ठाकरे यांनी दिला.
राज्यातील विविध प्रकल्प, जमिनी अदानी, अंबानीच्या घशात घातल्या जात असून आता शहरेही त्यांना आंदण देण्याचा डाव आखला जात आहे. ठाणे जिल्ह्यावर कब्जा केल्याशिवाय मुंबईला हात लावता येत नाही, म्हणून बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, विमानतळनंतर आता संजय गांधी उद्यानातील झाडे तोडून, तेथील आदिवासींना हटवून ही जागा अदानीला देण्याचा घाट घातला जात आहे. – राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण

![]()




