जळगाव समाचार | १९ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी परिसरासह अनेक ग्रामीण भागात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक धडाक्यात सुरू आहे. महसूल प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या आशीर्वादाने हा काळाबाजार दिवसेंदिवस फोफावत असून, या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत, तर अपघाताची शक्यताही वाढली आहे. रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि प्रशासनाचे मौन यावरून “कोणाच्या छत्रछायेखाली हा वाळू माफिया बिनधास्त धंदा करतोय?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
रात्रीच्या वेळी ट्रक, डंपर आणि ट्रॅक्टरने क्षमतेपेक्षा अधिक वाळू भरून वाहतूक सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. महसूल अधिकाऱ्यांना याची पूर्ण कल्पना असूनही कारवाई करण्यात ते अपयशी ठरले आहेत. ग्रामस्थांच्या मते, महसूल विभागाचे काही कर्मचारी वाळू माफियांच्या संगनमतानेच हा प्रकार डोळेझाक करून चालू ठेवत आहेत. शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत असताना, स्थानिक प्रशासनाकडून केवळ कागदी हालचाली होत आहेत.
अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची ताकद संपली असून, ठिकठिकाणी रस्ते खचले आहेत. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघाताचा धोका वाढला असतानाही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “प्रशासन आणि महसूल अधिकारी माफियांच्या खिशात गेलेत का?” असा प्रश्न लोकवर्गातून जोरात विचारला जात आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक तात्काळ थांबवून रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः हस्तक्षेप करून महसूल विभाग व पोलिस यंत्रणेतील निष्क्रीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

![]()




