जळगाव समाचार | १५ ऑक्टोबर २०२५
बी.आर. चोप्रा यांच्या प्रसिद्ध ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका साकारून प्रचंड लोकप्रिय झालेले ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. ते ६८ वर्षांचे होते. काही वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले होते. उपचारांनंतर ते बरे झाले होते, मात्र काही महिन्यांपूर्वी पुन्हा कॅन्सरचा पुनरुद्भव झाला. प्रकृती खालावल्यानंतर आज, बुधवार (१५ ऑक्टोबर) रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती त्यांच्या मित्राने, अभिनेता अमित बहल यांनी दिली.
पंकज धीर यांनी ‘महाभारत’ व्यतिरिक्त सडक, सोल्जर, बादशाह यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या होत्या. त्यांचा भारदस्त आवाज, प्रभावी व्यक्तिमत्व आणि ठसठशीत अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले. दूरदर्शनवरील ‘महाभारत’ मालिकेतील कर्णाच्या भूमिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली होती.
अभिनेते पंकज धीर यांच्यावर आज मुंबईतील विलेपार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीय, जवळचे मित्र आणि चित्रपटसृष्टीतील कलाकार उपस्थित राहणार आहेत. पंकज धीर यांचा मुलगा निकितन धीर हा देखील लोकप्रिय अभिनेता असून ‘जोधा अकबर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ मधील त्याच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत.

![]()




