जळगाव समाचार | 14 ऑक्टोबर 2025
दिवाळीला काहीच दिवस शिल्लक असताना सोन्यापाठोपाठ चांदीचे दर अक्षरशः विक्रमी पातळीवर झेपावले आहेत. सध्या बाजारात जीएसटीसह चांदीचा दर प्रतिकिलो ₹1,85,000 इतका झाला असून, गेल्या आठ दिवसांत तब्बल ₹25,000ची उसळी घेतल्याचे दिसून येत आहे. तर सोन्याचा दर जीएसटीसह प्रति दहा ग्रॅम ₹1,28,000पर्यंत पोहोचला आहे.
एमसीएक्स या देशपातळीवरील वायदेबाजारात 9 ऑक्टोबर रोजी चांदीचा दर प्रतिकिलो ₹1,58,000 इतका होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच, 13 ऑक्टोबरला तो ₹1,71,850 पर्यंत पोहोचला. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली मागणी आणि पुरवठ्यातील मर्यादा यामुळे चांदीचा भाव आकाशाला भिडला आहे.
तज्ज्ञांच्या मते, इलेक्ट्रिक वाहनं, सौरऊर्जा आणि सेमीकंडक्टर उद्योगांमध्ये चांदीची झपाट्याने वाढलेली मागणी हे भाववाढीमागचं प्रमुख कारण आहे. जागतिक बाजारात पुरवठा कमी होत असताना भारतात दिवाळीच्या खरेदीमुळे लक्ष्मीप्रतिमा, नाणी, समई, आणि पूजेच्या वस्तूंना मोठी मागणी निर्माण झाली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात चांदीचे भाव आणखी तेजावले आहेत.
सध्या 24 कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम दर ₹1,24,000 असून, जीएसटीसह ₹1,27,720 रुपये मोजावे लागत आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचा दर ₹1,15,400 असून जीएसटीसह तो ₹1,18,862 रुपये इतका झाला आहे.
दिवाळीच्या उत्सवी खरेदीचा हंगाम सुरू झाल्याने सोन्या-चांदीच्या बाजारात प्रचंड उलाढाल सुरू आहे. दरांमध्ये झालेली ही विक्रमी वाढ ग्राहकांना थोडीशी चिंता निर्माण करणारी असली तरी सुवर्णखरेदीची पारंपरिक ओढ मात्र कायम असल्याचे चित्र बाजारात दिसत आहे.