जळगाव समाचार | १४ ऑक्टोबर २०२५
राज्य सरकारकडून यापूर्वीच २२० कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी मिळाल्यानंतर आता जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आणखी ३०० नव्या पदांची भरती करण्याची तयारी सुरू केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, संबंधित प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
या बैठकीस अध्यक्ष संजय पवार, ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील, मेहताबसिंग नाईक, प्रताप पाटील, नाना पाटील आणि कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते ३०० कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मात्र, या भरती प्रक्रियेबाबत बँकेचे ज्येष्ठ संचालक आमदार एकनाथ खडसे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. कोणत्याही प्रकारची शिफारस किंवा वशिलेबाजी सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. “गेल्या वेळी बँकेने २५० हून अधिक पदांची भरती नामांकित कंपनीमार्फत पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केली होती आणि एकही तक्रार झाली नव्हती. तसेच पारदर्शक धोरण यावेळीही राबवले जावे,” असे खडसे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य शासनाने जिल्हा सहकारी बँकांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील काळात संचालक मंडळाचा हस्तक्षेप टाळण्यासाठी उमेदवारांची निवड आयबीपीएस (IBPS) किंवा टीसीएस (TCS) सारख्या नामांकित बाह्य संस्थांमार्फतच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय दबाव, वशिलेबाजी किंवा व्यक्तिगत स्वार्थामुळे होणारा हस्तक्षेप कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः नांदेड आणि परभणी येथे भरती प्रक्रियेत अनियमिततेच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आमदार खडसे यांनी जळगाव जिल्हा बँकेच्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेवर शासनाने तातडीने दखल घेऊन मान्यताप्राप्त संस्थांमार्फतच भरती प्रक्रिया पार पाडावी, अशी मागणी केली आहे.
शासनाने पूर्वीच सात नामांकित संस्थांना अशा भरतींसाठी मान्यता दिली होती, त्यामध्ये आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल या प्रमुख संस्थांचा समावेश आहे. मात्र अजूनही काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक पातळीवर भरती प्रक्रिया राबवली जात असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करून पारदर्शक व गुणवत्ता आधारित भरती सुनिश्चित करावी, असा ठाम आग्रह आमदार खडसे यांनी व्यक्त केला आहे.