जळगाव समाचार | ११ ऑक्टोबर २०२५
राज्यातील अतिवृष्टीमुळे सुमारे ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, अनेक शेतकऱ्यांचे पीक पूर्णतः वाहून गेले आहे. अशा संवेदनशील काळात सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी चोपडा येथे बँक शाखेच्या उद्घाटनावेळी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. “लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे, आम्हाला निवडून यायचं म्हणून आश्वासनं द्यावी लागतात,” असे त्यांनी बोलल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शेतकरीवर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटली.
या वक्तव्यावरून विरोधक आणि शेतकरी संघटना दोन्हीकडून संताप व्यक्त करण्यात आला. “अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळाने आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या वक्तव्याने केले आहे,” अशी टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. त्यांनी “ओला दुष्काळ” जाहीर करण्याची मागणी करत अन्यथा राज्यातील मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदीचा इशारा दिला आहे.
वाद वाढल्यानंतर बाबासाहेब पाटील यांनी तात्काळ दिलगिरी व्यक्त केली. “मी स्वतः शेतकरी आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याचे वाईट वाटते. कर्जमाफीचा उल्लेख मी केवळ बँकिंग प्रक्रियेच्या संदर्भात केला होता,” असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, शेतकरी संघटनांनी हे स्पष्टीकरण अपुरे असल्याचे सांगत पाटील यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी कायम ठेवली आहे.