जळगाव समाचार | ९ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्हा पोलीस दलाने ९ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत शहरात ‘वॉश आऊट’ या शोध मोहिमेअंतर्गत मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. या धडक कारवाईत ८४ हून अधिक विविध गंभीर गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना अटक करण्यात आली.
ही मोहीम जळगाव शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी, जळगाव तालुका आणि रामानंद नगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संवेदनशील भागांना लक्ष्य करून राबवण्यात आली होती. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली. अटकेत असलेल्यांमध्ये हद्दपार केलेले, इतर गुन्ह्यांमधील फरार असलेले, रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, चोरटे आणि दारू विक्रेते यांचा समावेश होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी या कारवाईचे नियोजन केले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी, शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, एमआयडीसीचे बबन आव्हाड, जिल्हापेठचे प्रदीप ठाकूर, जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे आणि रामानंदनगरचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी कारवाईत सक्रिय सहभाग घेतला.
जिल्हा पोलीस दलाने सांगितले की, शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा प्रकारच्या मोहीमांचा नियमितपणे आयोजन केले जात आहे. विशेषतः विनापरवानगी हद्दपार असताना शहरात दाखल झालेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जात आहे, आणि अटकेत असलेल्या सर्वांना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाईसह ताब्यात घेतले आहे.