विषारी कफ सिरप प्रकरणात कारवाई : स्रेसन फार्माचे मालक जी. रंगनाथन अटकेत

जळगाव समाचार | ९ ऑक्टोबर २०२५

मध्य प्रदेशात विषारी Coldrif कफ सिरप पिल्याने २१ लहान मुलांचा मृत्यू झाल्याच्या भीषण घटनेनंतर अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात चेन्नईस्थित स्रेसन फार्मासिटिकल्सचे मालक जी. रंगनाथन (वय ७३) यांना मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. रंगनाथन हे मद्रास मेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी असून गेल्या चार दशकांपासून औषधनिर्मिती व्यवसायात कार्यरत आहेत.

१९८० च्या दशकात त्यांनी ‘प्रोनीट’ नावाचे पोषणदायी सिरप बाजारात आणत स्वतःच बालरोगतज्ञांकडे त्याचे प्रमोशन केले होते. या उत्पादनाने त्यांना मोठी ओळख मिळवून दिली. मात्र त्यावेळी राज्य सरकारच्या ड्रग्स कंट्रोल विभागाने परवानगीशिवाय उत्पादन सुरू ठेवल्याबद्दल आक्षेप घेतला होता. नंतर सर्व परवानग्या घेत रंगनाथन यांनी व्यवसाय सुरू ठेवला आणि स्रेसन फार्मासिटिकल्स तसेच Ceego Labs आणि Aven Healthcare या कंपन्यांमधून व्यवसायाचा विस्तार केला.

मात्र, आता Coldrif कफ सिरपमध्ये हानिकारक पदार्थ आढळल्याने त्यांची प्रतिमा डागाळली आहे. तमिळनाडूतील लॅबमध्ये तपासणीदरम्यान सिरपमध्ये घातक रासायनिक घटक आढळले, त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने या औषधावर तसेच स्रेसन फार्मासिटिकल्सच्या इतर उत्पादनांवर बंदी घातली आहे.

चेन्नई-बंगळुरू हायवेवरील कंपनीचे २ हजार स्क्वेअर फूटचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट सील करण्यात आले असून कोडमबक्कम येथील कार्यालयालाही टाळं लावण्यात आलं आहे. स्थानिकांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी पूर्ण शांतता आहे आणि कर्मचाऱ्यांनी रात्रीतच संगणक व उपकरणं हटवली. सध्या पोलिसांकडून रंगनाथन यांची चौकशी सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here