जळगावात अतिवृष्टीमुळे भिजलेला कापूस वाळविण्यासाठी बळीराजाची धडपड…

जळगाव समाचार | ३ ऑक्टोबर २०२५

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सप्टेंबरमधील नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांना नुकसान झाले असून, त्यात सर्वाधिक ९० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. शेतकरी दसरा-दिवाळीस कापूस घरात येण्याची अपेक्षा बाळगून होते, मात्र सततच्या पावसामुळे पीक काळवंडले असून, जेमतेम हाताशी आलेल्या कापसाला वाळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना विशेष मेहनत घ्यावी लागत आहे.

यंदा रोग, किडींचा विळखा, उत्पादनात घट, मजूर टंचाई आणि कमी भाव यांसारख्या कारणांमुळे शेतकऱ्यांनी आधीच कपाशीची लागवड कमी केली होती. महागडे बीटी बियाणे, रासायनिक खतं, किटकनाशके आणि मशागतीवर मोठ्या प्रमाणात खर्च केल्यावरही नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.

अत्यधिक पावसामुळे शेतातील मातीही खुरडली गेली असून, काही ठिकाणी जेमतेम उरलेले कापूस पावसात भिजल्याने दर्जा खालावला आहे. गावोगावी शेतकरी वेचलेला कापूस घरासमोर किंवा अंगणात वाळवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र ओल्या कापसाचा बाजारभाव अपेक्षित मिळेल की नाही, याबाबत साशंकता दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना मजुरी दर वाढवून कापूस वेचावा लागत आहे, पण पाणी निघेपर्यंत कापूस साठवणे अवघड झाले आहे. त्यामुळे पीक पिवळसर होण्याची भीती शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. अवकाळी पावसामुळे कपाशीची झाडे खराब झाल्यामुळे पहिल्याच वेचणीत शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.

हंगामाच्या सुरूवातीलाच कापसाचे दर घसरले आहेत. दर्जा खालावल्यास बाजारात त्यास आणखी कमी भाव मिळण्याची शक्यता असल्याने ओला कापूस अंगणात वाळवण्याची धडपड करीत आहे. – पद्माकर पाटील (शेतकरी- ममुराबाद, ता. जि. जळगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here