“वाघाचं कातडं पांघरलेलं गाढव ऐकलं होतं, पण भगवी शाल पांघरलेलं गाढव पहिल्यांदाच पाहिलं” – उद्धव ठाकरे

 

जळगाव समाचार | २ ऑक्टोबर २०२५

शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चा दसरा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सत्ताधाऱ्यांना सवालांचा पाऊस पाडला.

ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात परंपरेप्रमाणे विजयादशमीच्या शुभेच्छांपासून केली. “जिवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोनं आहे. काहींना पळवलं गेलं, पण ते पितळ निघालं, सोनं माझ्याकडेच आहे,” असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे अप्रत्यक्षपणे लगावला. “वाघाचं कातडं पांघरलेल्या गाढवाची गोष्ट आपण ऐकली आहे, पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेलं गाढव मी पहिल्यांदाच पाहिलं,” अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली.

राज्यातील अतीवृष्टी, ओला दुष्काळ आणि शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवरून ठाकरेंनी सरकारला धारेवर धरले. “आजचे मुख्यमंत्री विरोधात असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची बोंबाबोंब करत होते, पण सत्तेत आल्यावर म्हणतात ओला दुष्काळ ही संज्ञाच नाही. खड्ड्यात घाला तुमची संज्ञा, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या. शेतकऱ्यांची २०१७ मधली कर्जमुक्ती अजून पूर्ण झालेली नाही. आमच्या काळात मात्र कर्जमुक्ती वेळेत केली होती,” असा दावा त्यांनी केला.

ठाकरेंनी भाजप आणि केंद्र सरकारवरही जोरदार निशाणा साधला. “सगळीकडे चिखल झाला आहे, याचं कारण कमळाबाई आहे. कमळ फुललं, पण जनतेच्या आयुष्याचा चिखल केला,” असे ते म्हणाले. आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना खेळल्याबद्दल त्यांनी मोदींवर टीका करत, “देशप्रेमाचं नाटक एका बाजूला आणि पाकिस्तानशी क्रिकेट दुसऱ्या बाजूला, हेच तुमचं राष्ट्रवादाचं तत्त्वज्ञान आहे का?” असा सवाल केला.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरेंनी भाजपावर पलटवार केला. “हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या टोप्या घातलेल्या फोटोंचं प्रदर्शन मी करीन. एका राज्यात गोवंश हत्याबंदी आणि दुसऱ्या राज्यात गोमांस खाणं, ही तुमची हिंदुत्वाची व्याख्या का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज ठाकरेंसोबतच्या युतीविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जिथे मातृभाषेवर घाला घातला जाईल, तिथे आम्ही मराठी माणसात फूट पडू देणार नाही. मुंबई मराठी रक्ताने मिळवली आहे, ती जर व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून ती परत मिळवल्याशिवाय आम्ही राहणार नाही.”

देशातील परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी मणिपूरमधील हिंसाचार, सोनम वांगचुक यांना रासुका अंतर्गत झालेली अटक आणि जनसुरक्षा कायद्याचा गैरवापर यावरही सरकारला प्रश्न विचारले. “मोदींनी मणिपूरमध्ये भाषणात ‘मणिपूर के नाम में मणी है’ असं म्हटलं, पण तिथल्या जनतेच्या डोळ्यातलं पाणी दिसलं नाही,” असा घणाघात त्यांनी केला.

शेवटी ठाकरेंनी जनतेला स्वाभिमानी मतदार होण्याचं आवाहन करत, “प्रत्येक टपरीवर ‘चाय पे चर्चा’ नको, आता भ्रष्टाचार पे चर्चा हवी. शेतकऱ्यांना हक्काची मदत न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार. अन्याय कुठेही दिसला, तर त्यावर वार केला पाहिजे. अंधभक्तांच्या डोळ्यावरची पट्टी काढून खऱ्या हिंदुत्वाचं दर्शन घडवणं हाच पुढचा कार्यक्रम असेल,” असे ठाम शब्दांत सांगून त्यांनी भाषणाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here