जळगाव समाचार | ३० सप्टेंबर २०२५
आगामी ६४ वी राज्य नाट्यस्पर्धा (शासकीय) – जळगाव केंद्र येत्या ३ नोव्हेंबरपासून जळगावात होत असून, या स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
कलावंतांच्या निवेदनावर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित प्रतिसाद देत सांगितले की, “सदर नाट्यगृहात एसी व काही खुर्च्यांच्या किरकोळ दुरुस्ती वगळता हॉल नाट्यप्रयोगासाठी योग्य स्थितीत आहे. ही स्थिती मान्य असल्यास नाट्यगृह तत्काळ उपलब्ध आहे,” असे सांगत सार्वजनिक बांधकाम विभागाला आवश्यक ती कार्यवाही करण्यास निर्देश दिले.
यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे व गौरव लवंगले यांनी बालगंधर्व खुले नाट्यगृहाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, “या नाट्यगृहाच्या दुरुस्तीसाठी इस्टिमेट मागवून निधी उपलब्ध करून देण्यात येईल,” असे आश्वासन दिले.
या निवेदन देतेवेळी ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भोळे यांच्यासह विनोद ढगे, गौरव लवंगले, अमोल ठाकूर, दिशा ठाकूर, प्रदीप भोई, आकाश बाविस्कर, किरण बोरसे, सुदर्शन पाटील, सचिन महाजन, हृषिकेश सोनवणे, रवींद्र कोळी, डॉ वैभव मावळे आदी कलावंत उपस्थित होते.