जळगाव समाचार | २९ सप्टेंबर २०२५
भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवून नवव्यांदा विजेतेपद पटकावले. मात्र विजयाच्या दिवशी भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष व पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख तसेच मंत्री मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे सामन्यानंतर जवळपास तासभर पारितोषिक वितरण समारंभ थांबला होता.
पीटीआयच्या माहितीनुसार, भारतीय संघाने एकत्रितपणे व्यासपीठावर न जाताच ट्रॉफी स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. फक्त अभिषेक शर्मा, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव यांनी व्यक्तिगत पारितोषिके घेतली, पण संघाने सामूहिकरित्या मंचावर पाऊल ठेवले नाही. यामुळे भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवची विजयानंतरची मुलाखतही घेण्यात आली नाही. सूत्रसंचालक सायमन डुल यांनी समारंभ लवकर संपल्याची घोषणा केली.
दरम्यान, सामना संपल्यानंतर जवळपास ५५ मिनिटे पाकिस्तानी खेळाडू ड्रेसिंग रूममधून बाहेर आलेच नाहीत. व्यासपीठावर मोहसिन नक्वी एकटेच उभे राहिले होते. अखेरीस पाकिस्तानचे खेळाडू मैदानावर आल्यावर त्यांचे स्वागत भारतीय प्रेक्षकांनी “इंडियाआ… इंडियाआ…” अशा घोषणांनी केले. हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला.
अंतिम सामन्यापूर्वीच चर्चेत होते की भारतीय संघ ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देऊ शकतो, कारण पुरस्कार देणारे मोहसिन नक्वी भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. अलीकडेच त्यांनी ‘एक्स’ वर गूढ व्हिडिओ शेअर केले होते. त्याचप्रमाणे पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफ याने भारताविरुद्ध सामन्यात केलेल्या वादग्रस्त सेलिब्रेशनमुळे दंड ठोठावण्यात आला होता.